Osmanabad : सीना-कोळेगाव धरण १०० टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sina Dam

Osmanabad : सीना-कोळेगाव धरण १०० टक्के

परंडा : परतीचा पाऊस गायब असला तरीही नगर जिल्ह्यात दमदार पाऊस होऊन सीना नदी दुधडी भरून वाहत असल्याने तालुक्यातील सीना-कोळेगाव सर्वात मोठा प्रकल्प सलग तिसऱ्या वर्षी यंदाही शनिवारी रोजी दुपारी ४ वाजता १०० टक्के तुडुंब भरला आहे. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला तर या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यासाठी यंत्रणा सतर्क असून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे नदी पात्र परिसरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या सीना कोळेगाव प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ होत आहे. काही दिवसांपासून परतीचा दमदार पाऊस झाला नाही. मात्र वरील भागात नगर जिल्हा परिसरात मोठे पाऊस झाल्याने सीना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले. तालुक्याचे वैभव असलेल्या महत्त्वाच्या सीना कोळेगाव धरणात पाणीसाठा होऊन पूर्ण क्षमतेने भरले.

यंदाच्या पावसाळ्यात यापूर्वी तालुक्यातील खासापुरी, चांदणी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तसेच निम्न खैरी पांढरेवाडी बृहत लघू प्रकल्प १०० टक्के भरला असल्यामुळे सिंचनात मोठी वाढ झाली आहे. नगर जिल्हा भागात झालेल्या दमदार पावसामुळे सीना, नळी व खैरी या तीन नद्यांचा संगम धरण क्षेत्रातील डोंजा परिसरात होत असून तिन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे निम्नखैरी पांढरेवाडी प्रकल्प ओअरफ्लो होऊन सांडव्यातील पाणी सीना नदीत पात्रातून सीना-कोळेगाव प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वेगाने आले.

शनिवारी धरण १००% भरले आहे. प्रशासनाच्यावतीने नदी काठच्या गावांना व शेतकऱ्यांना, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी सन २००७ मध्ये जिल्ह्यात सर्वात मोठा ५.३० टीएमसी क्षमतेचा सीना-कोळेगाव उभारला गेला. त्यामुळे परंडा तालुक्यातील ६८०० हेक्टर व करमाळा तालुक्यातील ३४०० हेक्टर अशी ऐकून १०२०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट होते. सीना कोळेगाव प्रकल्पाची १५०.४९ दलघमी पाणीसाठा क्षमता आहे. डोंजा भागातील निम्न खैरी नदीवरील पांढरेवाडी प्रकल्प ओहर फ्लो झाल्यामुळे अतिरिक्त पाणी तसेच सीना नदीचे संगोबा येथून पाणी या प्रकल्पात येत आहे. रात्रीतून पाणीसाठा वाढल्यास दरवाजे उघडून पाणी सोडले जाणार आहे.

टॅग्स :OsmanabadwaterdamRiver