Video :  मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे उघडले

डॉ. माधव सावरगावे
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

मराठवाड्यातील जायकवाडी धरण 100 टक्के भरल्यानंतर धरणाचे सोळा दरवाजे उघडून 12 हजार 970 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. धरणाच्या एकूण दरवाजांपैकी 12 दरवाजे हे अर्ध्या फुटाने तर 4 दरवाजे हे एक फुटाने उघडण्यात आले आहेत.

औरंगाबाद - मराठवाड्यातील जायकवाडी धरण 100 टक्के भरल्यानंतर धरणाचे सोळा दरवाजे उघडून 12 हजार 970 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. धरणाच्या एकूण दरवाजांपैकी 12 दरवाजे हे अर्ध्या फुटाने तर 4 दरवाजे हे एक फुटाने उघडण्यात आले आहेत. मुख्य 16 दरवाज्यातून 10 हजार 480 क्युसेक्स, वीज निर्मिती केंद्राच्या दरवाज्यातून 1590, डाव्या कालव्यातून 1200, उजव्या कालव्यातून 700 क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे.

सध्या नगर आणि नाशिक जिल्ह्यातून गोदावरी नदी पात्रातून धरणामध्ये जवळपास 13 हजार क्यूसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे जितके पाणी धरणामध्ये जमा होतंय, तितकं पाणी धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये सोडण्यात येत आहे. हे पाणी सोडल्यानंतर गोदावरी नदीवरील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड या पाच जिल्ह्यातील बारा बंधारे 90 टक्‍क्‍यांपर्यंत भरून घेण्यात येणार आहेत. त्यासोबतच उजव्या कालव्यातून माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचाही प्रयत्न सुरू असणार आहे. 

रविवारी सायंकाळपासून पाणी सोडायला सुरुवात झाली. सुरुवातीला 4 त्यानंतर रात्री 12 आणि आज सकाळी 16 दरवाजातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पाणी सोडण्यापूर्वी गोदा काठावरील नागरिकांना गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sixteen doors of Jayakwadi dam opened