esakal | डिसेंबरपासून ऑरिकमध्ये कौशल्याचे धडे
sakal

बोलून बातमी शोधा

आॅरिक सिटी औरंगाबाद

नव्या सेक्‍शन आठ कंपनींसह संचालक मंडळाची स्थापना 

डिसेंबरपासून ऑरिकमध्ये कौशल्याचे धडे

sakal_logo
By
आदित्य वाघमारे

औरंगाबाद -  'डीएमआयसी'च्या सर्व नोडला मागे टाकून देशात सर्वाधिक गुंतवणूक पटकावणाऱ्या "ऑरिक'ने आता कौशल्य विकासाकडे एक पाऊल टाकले आहे.

ऑरिकमध्ये कौशल्य विकासासाठी पूर्णवेळ संस्था कार्यरत करण्यासाठी एका सेक्‍शन आठ कंपनीसह संचालक मंडळाची नेमणूक करण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस ऑरिक हॉलमध्ये कौशल्यावर आधारित हे स्कील सेंटर सुरू करण्यात येणार आहे. 
ऑरिक या देशातील पहिल्या औद्योगिक-रहिवासी स्मार्ट सिटीने नव्या उपक्रमाचा श्रीगणेशा केला आहे. औरंगाबादेत कार्यरत कंपन्यांना कौशल्याने सक्षम मनुष्यबळ पुरवण्यासाठी "स्किल सेंटर' उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्राच्या उभारणीचा आराखडा आता मूर्त रूप घ्यायला लागला असून, हे केंद्र चालवण्यासाठी लवकरत "एक्‍स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट' प्रसिद्ध करण्याची तयारी औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिपने चालवली आहे. हे केंद्र चालवण्यासाठी स्थानिक औद्योगिक संघटनेने पुढाकार घेतला आहे. यामध्ये कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज (सीआयआय) आणि चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रिकल्चर (सीएमआयए) अग्रभागी आहेत. या स्किल सेंटरच्या संचालक मंडळावर ऑरिकचे दोघे, संचालक भास्कर मुंढे, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि आयटीआयचे प्राचार्य, सीआयआय आणि सीएमआयएचे प्रतिनिधी असे समाविष्ट राहणार आहेत. 
 
तीन एकर जागेत होणार केंद्र 
ऑरिकच्या शेंद्रा येथील नोडमध्ये स्किल सेंटरच्या उभारणीसाठी तीन एकर जागा ही राखीव ठेवण्यात आली आहे. ही जागा या नव्या कारभारी मंडळाला देण्यात येणार आहे. त्यावरील या केंद्रासाठी लागणाऱ्या इमारती उभारण्यासाठी ऑरिकतर्फे काही निधीही देण्यात येणार आहे. या विषयांचा निपटारा करून डिसेंबर 2019 पर्यंत किमान तीन ते चार अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस ऑरिकच्या कारभाऱ्यांचा आहे. या इमारती उभ्या करेपर्यंत हे अभ्यासक्रम ऑरिक हॉलमध्ये चालवण्यात येणार आहेत. 

ऑरिकमधील स्किल सेंटरचा अभ्यासक्रम येथील कंपन्यांच्या सहमतीने ठरणार आहे. हे येथील वेगळेपण असेल. यासाठीचे कार्यकारी मंडळ ठरले आहे. डिसेंबरपासून ऑरिक हॉलमध्ये याचे पहिले वर्ग सुरू असलेले आपण पाहू शकणार आहोत. 
- गजानन पाटील (सहसरव्यवस्थापक, ऑरिक) 

loading image
go to top