esakal | जयसिंग व धनंजय मधला जय, गोपीनाथ आणि एकनाथामधील नाथ हा भाजपच्या नेतृत्वाला नको होता
sakal

बोलून बातमी शोधा

Social Justice Minister Dhananjay Mundhe said that the Mahavikras Aghadi government, which is currently the best example of democracy in the state, has come to power..jpg

मंत्री धनंजय मुंढे म्हणाले, राज्यात सध्या लोकशाहीचे उत्तम उदाहरण असलेले महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या संकटातही महाविकास आघाडीचे सरकार उत्तम कामे करीत आहे.

जयसिंग व धनंजय मधला जय, गोपीनाथ आणि एकनाथामधील नाथ हा भाजपच्या नेतृत्वाला नको होता

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : भारतीय जनता पक्षात द्वेषाचे राजकारण सुरु झाले आहे. त्यांना आमच्या नावांशीच वैर होते. जयसिंग व धनंजय मधला जय, गोपीनाथ आणि एकनाथामधील नाथ हा भाजपच्या नेतृत्वाला नको होता, असा आरोप सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांनी परभणीत केला. द्वेषाने भरलेला पक्ष एक दिवस रसतळाला गेल्या शिवाय राहणार नाही, असे ही ते म्हणाले.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस व शिवसेना यांचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ श्री. मुंढे शनिवारी परभणीत आले होते. श्री. शिवाजी महाविद्यालयात त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा झाला. व्यासपीठावर परभणीचे खासदार संजय जाधव, खासदार प्रा. फौजिया खान, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार विक्रम काळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम आदींची उपस्थिती होती.

मंत्री धनंजय मुंढे म्हणाले, राज्यात सध्या लोकशाहीचे उत्तम उदाहरण असलेले महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या संकटातही महाविकास आघाडीचे सरकार उत्तम कामे करीत आहे. पदवीधर, बेरोजगार यांच्या प्रश्नावर सातत्याने सरकार चांगले निर्णय घेत आहे. आगामी काळात मेगा नोकर भरतीच्या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले जाणार आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याऱ्यांची संख्या आता वाढत आहे. या पक्षात द्वेषाचे राजकारण सुरु झाले आहे. 

नुकतेच भाजप मधून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये आलेले माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्या भाषणाचा धागा पकडत श्री. मुंढे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, या पक्षात आमच्या नावालाच विरोध होता. जयसिंगराव गायकवाड यांच्यातील व माझ्या नावातील जय, गोपीनाथ मुंढे व एकनाथ खडसे यांच्या नावातील नाथ यांना नको होता. त्यामुळे पराकोटीचा त्रास देवून राजकारण संपविण्याचे काम या पक्षातील नेत्यांनी केले आहे. आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार उत्तम कार्य करणार आहे. त्यामुळे राज्यात भाजप 'बी' ला सुध्दा सापडणार नाही असे ते म्हणाले. पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांना पहिल्या पसंतीचे मत द्यावे असे आवाहन केले.

क्षणा - क्षणाला होणारा अपमान सहन होत नव्हता, कुठेही मान-सन्मानही मिळत नव्हता. कामे होत नव्हती व मिळतही नव्हती. त्यामुळे भारतीय जनता पक्षात माझा जीव गुदमरून गेला होता. अखेर हा अपमान सहन न झाल्याने मी पक्षाला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये आलो आहे. आता मला आपल्या माणसात आल्यासारख वाटत आहे, असे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी सांगत आपली खदखद व्यक्त केली.

ते म्हणाले, भाजपमधील नेत्यांना मस्ती चढली आहे. सत्तेचा उन्माद आला आहे. तीच मस्ती व तोच उन्माद खाली उतरविण्याचे काम मला आगामी काळात करायचे आहे. माझे आयुष्य वाटेवर पडलेले नाही. भाजपमधील एकाही नेत्याने माझ्या विरोधात बोलून दाखवावे, असे आव्हान देत त्यांनी भाजपच्या एकाही नेत्यामध्ये माझ्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही, असे सांगितले.

loading image