
शंभर मिलिमीटर पाऊस झाल्यावरच करा पेरणी
हिंगोली : जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५४ मिमी सरासरी पाऊस झाला. तो पेरणीयोग्य नाही. किमान शंभर मिमी पाऊस होईपर्यंत व जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओल उपलब्ध होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
मृग नक्षत्रात पेरणी व्हावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा असते. पण, अजूनही जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. जिल्ह्यातील काही भागात थोड्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या चोहीकडे पेरणीची लगबग सुरू आहे. शेतकरी जमिनीची पूर्व मशागत करून ती पेरणी योग्य करताना दिसत आहे. पण, यावर्षी तापमान जास्त असल्याने शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पीक पेरणीची जोखीम शेतकऱ्यांनी घेऊ नये. तीन सेमी. ओल जमिनीत गेल्याशिवाय पिकांची लागवड करू नये, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यासाठी ५५ हजार ४०३ मेट्रीक टन खत
खरीप हंगाम २०२२ मध्ये प्रस्तावित तीन लाख ५३ हजार ६२४ हेक्टर पेरणी क्षेत्रासाठी आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकूण ५५ हजार ४०३ मेट्रीक टन खते उपलब्ध झाली आहेत. त्यापैकी ३० हजार ४१ मेट्रीक टन खतांची विक्री झाली. आजघडीला जिल्ह्यात २५ हजार ३६१ मेट्रीक टन खतांचा साठा शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी केवळ डीएपी खताची मागणी करू नये त्यातही विशिष्ट उत्पादकाच्या डीएपीसाठी आग्रह धरू, नये असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.
सोयाबीनसाठी वापरा एनपीकेएस ग्रेड खत
वास्तविक पाहता सर्व कंपन्यांच्या डीएपीमध्ये १८ टक्के नत्र व ४६ टक्के स्फूरद हेच घटक उपलब्ध असतात. सोयाबीन पिकासाठी एनपीकेएस २० : २० : ०० : १३ या ग्रेडचे खत अतिशय उपयुक्त आहे; कारण त्यामध्ये सोयाबीन बियाणांमध्ये तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक असलेले सल्फर १३ टक्के आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपीऐवजी एनपीकेएस या ग्रेडच्या खताचा सोयाबीनसाठी वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: Sowing On Only Hundred Millimeters Of Rainfall
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..