सोयाबीनचा दर्जा घसरला : कशामुळे ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

शेतकरी प्रत्येक वर्षी अस्मानी संकटाला तोंड देत जीवन काढत आहे. यंदा पीक चांगले आले; पण अवकाळी पावसाने हाताशी आलेली पीके हिरावून घेतली आहे.

नांदेड : खरीप हंगामातील सोयाबीन काढण्याच्या वेळी अवकाळी पावसाचा जबर फटका बसला. बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झालेल्या ८० टक्के सोयाबीनचा दर्जा घसरला आहे. त्याचा परिणामसोयाबीनच्या दर्जावर झाला. परिणामी हमीभाव मिळत नसल्याची ओरड शेतकरी करत आहेत.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश हा सोयाबीन उत्पादकांचा मोठा पट्टा आहे. दोन्ही राज्यात खरीप हंगामात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. विदर्भातही सोयाबीनच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. एकेकाळी कापूस उत्पादकांचा भाग म्हणून विदर्भ व मराठवाड्याची ओळख होती, मात्र गेल्याकाही वर्षापासून शेतकरी कापूस ऐवजी सोयाबीनकडे वळले आहेत. परिणामी सोयाबीनच्या पेऱ्यात प्रचंड वाढ झाली आहे. 

हेही वाचा थकबाकीसाठी शेतकरी संतप्त, मात्र प्रशासनाने झटकले हात

अवकाळी पावसाचा फटका
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीला दमदार पाऊस कोसळल्याने सोयाबीनचे पीक चांगले बहरले होते. सोयाबीनचे भरघोस व दर्जेदार उत्पादन येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऐन सोयाबीन सोंगणीच्या काळात परतीचा व त्यानंतर अवकाळी पाऊसही झाला. त्यामुळे शेतातील सोयाबीनचे उभे पीक काढायलाही वेळ मिळाला नसल्याने ते खराब झाले.

सोयाबीनला हमीभाव नाहीच
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये साधारणतः नोव्हेंबर ते जानेवारीच्या दरम्यान सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होते. गेल्या खरीप हंगामात सोयाबीनचे चांगले उत्पादन झाले. मात्र त्याचा दर्जा राखता आला नाही. अवकाळी पावसामुळे सोयाबीन दाणे काळे व लहान झाले. सुमारे ८० टक्के सोयाबीनचे दर्जाहीन उत्पादन झाले. केंद्र शासनाने सोयाबीनला तीन हजार ७१० रुपये हमीभाव जाहिर केला. सोयाबीनच्या उत्पादीत मालाचा दर्जाच नसल्याने बहुतांश मालाला हमीभाव मिळाला नाही.  

हेही वाचलेच पाहिजे - आजपासुन होट्टल महोत्सव; काय आहे महत्व ते वाचा

भाववाढीच्या अपेक्षेने साठवणूक
सोयाबीनला अधिक भाव मिळण्याच्या अपेक्षा असल्याने चांगल्या दर्जाच्या सोयाबीनची गोदामांमध्ये साठवणूक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीयसह स्थानिक बाजार पेठेत दरवाढ झाल्यावर ते सोयाबीन विक्रीसाठी बाजारपेठेत येण्याचा अंदाज आहे.
- गजानन कार्लेवार (व्यापारी)
 
सोयाबीन तेलाच्या भावात भडका
सोयाबीनच्या दर्जाहीन उत्पादनाचा फटका तेलाच्या उत्पादनावर झाला. तेल उत्पादक कंपन्यांना दर्जेदार सोयाबीनचा पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाच्या भावाचा चांगलाच भडका उडाला आहे. किलो मागे सोयाबीनचे तेल 15 ते 20 रुपयांनी महागल्याने ग्राहकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
- शशिकांत जायभाये (ज्येष्ठ नागरिक)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soybean grade deteriorates: why read it