सोयाबीन काढणीला पावसाचा ब्रेक

कमलेश जाब्रस 
Saturday, 3 October 2020

जूनच्या पूर्वाधात वेळेवर सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर उजाडला तरी थांबण्याचे नावच घेत नाही.

माजलगाव (बीड) : जूनच्या पूर्वाधात वेळेवर सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर उजाडला तरी थांबण्याचे नावच घेत नाही. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर बुधवारी (ता. ३०) शहरासह तालुका परिसरात जवळपास एक ते दीड तास झालेल्या दमदार पावसामुळे सोयाबीन काढणीला ब्रेक लागला. या पावसामुळे कापूस पिकाचेही नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

या खरीप हंगामात सुरवातीपासूनच चांगला पाऊस असल्याने धरण शंभर टक्के भरले आणि मोठ्या प्रमाणात धरणातून पाणी सोडण्यात आले. मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात थंडी जाणवू लागली होती. तर सकाळी धुकेही पडू लागले आणि दिवसभर पडत असलेल्या कडक उन्हामुळे कपाशीचे बोंडेसुद्धा फुटली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरवात केली होती. परंतु, बुधवारी दुपारी बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन काढणी थांबवावी लागली. काढणीअभावी शेतात उभे असलेले सोयाबीन काळवंडून जात आहे. याचा परिणाम थेट भावावर होणार आहे. 

शेतकरी प्रकाश खिस्ते म्हणाले, मृग नक्षत्रामध्ये कपाशीची लागवड केली. वेळेवर पाऊस पडला. त्यामुळे वेळोवेळी कीटकनाशकांची मात्रा दिली कापसाचे पीक जोमात आहे. परंतु, मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे व गोदावरीत सोडलेल्या पाण्यामुळे शेतामध्ये पाणी घुसून कापूस, सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. 

माजलगावचे कृषी अधिकारी एस. जी. हजारे म्हणाले, तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी ७४५ मिलिमीटर इतकी आहे. सप्टेंबर अखेरच ७४५ मिलिमीटर पाऊस झाला. आणखीन परतीचा पाऊस बरसत असल्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने विहीर, विंधन विहिरीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. अनेक ठिकाणच्या विंधन विहिरीतून पाणी वाहत आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soybean harvesting has come to a halt in Majalgaon due to torrential rains