esakal | सोयाबीनच्या झाल्या घुगऱ्या, कापसाच्या झाल्या वाती 
sakal

बोलून बातमी शोधा

hala

जिल्ह्यात सर्वत्र परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर आला असून या पावसाने उरलं सुरलेल शेतातील सर्व हिराऊन घेतल आहे. गावनिहाय तसेच वेगवेगळ्या तालुक्यातील झालेल्या नुकसानीने शेतकरी त्रस्त झाले आहेत.  

सोयाबीनच्या झाल्या घुगऱ्या, कापसाच्या झाल्या वाती 

sakal_logo
By
सकाळ वृतसेवा

सेलू ः तालुक्यात परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर आला असून या पावसाने उरलं सुरलेल शेतातील सर्व हिराऊन घेतल आहे. सोयाबीनच्या घुगऱ्या तर वेचणीस आलेल्या कापसाच्या वाती झाल्यामुळे आतोनात नुकसान झाले. 

परतीच्या पावसाने तालुक्यातील जवळपास सर्वच गाव शिवारातील खरिपाच्या पिकांना फटका बसला. या वर्षी लागवडीच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने ऑगस्ट पुर्ण व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत खरिप पिक जोमदार दिसत होती. परंतू, परिसरात परतीच्या पावसाने जोर धरला. ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या काही दिवस पावसाची उघडीप व ऊन पडल्याने काही शिवारातील पुर्णत: कापूस एकदम वेचणीस आला. परंतू, मजुराअभावी कापूस काढता आला नाही. याच वेळी सोयाबीनही काढणीस आल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली. याच दरम्यान पुन्हा परतीच्या पावसाने रौद्र रूप धारण करत मेघगर्जना, सुसाट वाऱ्यासह सर्वत्र थैमाण घातले. काढलेले तसेच काढणीस आलेले सोयाबीन पाण्याखाली गेले असल्याने घुगऱ्या तयार झाल्या. वेचणीस आलेल्या कापसाच्या वाती झाल्या. काही शिवारातील कापासाला कोंब फुटले. शेतातील पिकांचा पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात असली तरी प्रशासनाकडून अद्याप कुठलीच कार्यवाही करण्यात येत नसल्याने व शेतात लावलेला खर्च निघणार नाही अशी खात्री झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. 

हवामान खात्याच्या सुचनेने शेतकऱ्यात चिंता वाढली 
पाथरी ः प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्राने (ता.१३ ते १७) ऑक्टोबर या चार दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांत चिंता पसरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी नसर्गिक आपत्तीला तोंड देत शेती करीत आहेत. कधी पाऊस नसल्याने तर कधी जास्त पावसाने हाताला आलेली पिके जात आहेत. यंदा पहिल्यापासूनच चांगला पाऊस पडल्याने खरिपातील मूग, सोयाबीन, तूर, कापूस व ऊस ही पिके चांगली बहरली होती. परंतू, मूग काढणीच्या वेळी पावसाची झड लागल्याने मूग पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेले. तर पुन्हा दोन आठवड्यापूर्वी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीत मोठ्या अडचणी आल्या. यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता पहिल्या वेचणीचा कापूस काढणीस आला असताना पुन्हा प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्राने चार दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांत चिंता पसरली आहे. केवळ पावसामुळे मूग व सोयाबीन पिकांना बाधा पोहचली असल्याने पहिल्या वेचणीचा कापूस तरी घरी यावा यासाठी शेतकरी आगाऊचे पैसे देऊन कापूस वेचणी करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकाची मोठी धूळधाण 
झरी ः यावर्षी वरूणराजा जरा जास्तच मेहरबान झाला आहे. मागील तीन-चार दिवसांपासून परिसरात सर्वदूर पडत असलेल्या पावसाने सोयाबीन व कापूस हातचे गेले आहेत. पंधरा दिवसांपासून खंड दिल्यानंतर दहा ऑक्टोंबरपासून परतीचा पावसाचे परिसरात जोरदार आगमन झाले. या पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा कमी आणि नुकसान जास्त झाले आहे. नेमके कापूस वेचणीला, सोयाबीन काढणीला आले असताना तीन ते चार दिवसापासून नदी नाल्याचे पाणी आल्याने शेत शिवारात होत्याचे नव्हते झाले. परत शेतीत पाणी साठून कापूस व सोयाबीनची प्रचंड हानी झाली आहे. कापसातून आणि सोयाबीन मधून आत्ता अंकुरही फुटले लागले आहेत. त्यामुळे शेतकरी हाताश होऊन पिकाकडे पाहत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी, हरभरा पेरले त्या कोवळ्या पिकांनाही या पावसाने बाधा होणार असून पेरणी पुन्हा करावी लागणार आहे. 

हेही वाचा - परभणी ; थॅलेसिमीयाचे रुग्ण रक्त तुटवड्याने त्रस्त

शेतकऱ्यांवर निसर्गासोबत प्रशासनही कोपले 
ताडकळस ः पंचक्रोशीत अनेक दिवसांपासून हवामानाच्या बदलामुळे कधी वारा, कधी मुसळधार पाऊस, धुके, कीडरोगामुळे पीकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. कोपलेला निसर्ग व प्रशासनाच्या आकसबुद्धीने नुकसानग्रस्त शेतातील पिकांचा पंचनामा निरंक सादर केला आहे. शेतकऱ्यांची खरीप हंगामाची शेवटची आशा पीक विम्यावर असल्याचे दिसत होते. ते निरंक अहवालामुळे संपुष्टातच जमा झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासन, विमा कंपनीकडून पिकांच्या नुकसानीचा मोबदला मिळाला पाहीजे, अशी मागणी शेतकऱ्यांची होत आहे. 

हेही वाचा - जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल , बुधवारी २५३ कोरोनामुक्त ः ९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

हळदीला करप्या रोगाची लागण 
चारठाणा : परतीच्या पावसाने खरीपातील सोयाबीनसह कापूस, तूरीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची प्रशासनाकडून अजूनही कुठलीच दखल घेण्यात आली नाही. हळदीसाठी मागील वातावरण पोषक ठरल्याने पीक चांगलेच बहरावर आले होते. आता हळदीचे कंद परिपक्व होण्याच्या स्थितीत असताना पावसाने दणादण सुरू केली. त्यामुळे काढणीवर आलेल्या सोयाबीन व इतर पिकांना फटका बसला. त्याशिवाय अति पावसामुळे हळदीवर करपा रोगाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. हळदीवर करप्या रोग पडल्याने हळद उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. हळदीसाठी मोठा लागवड खर्च करून पिक जोपासले. खत, औषधी फवारणी, किड व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. परंतू, सद्यस्थितीत वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरण व सकाळ, सायंकाळी धुके पडत असल्याने हळदीवर मोठ्या प्रमाणात करपा रोग पडला आहे. महसूल विभागासह पिक विमा कंपनीच्या वतीने कुठलेच पंचनामे करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.  


लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी पाठपुरावा करावा 
परतीचा पावसाने खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन व कापूस पिक हातचे गेले. यावर्षी बँक कर्ज इतर मार्गाने कर्ज काढून शेतीसाठी लावलेला खर्च निघणार नाही. शासनाने कृषी, महसूल, पंचायत समितीच्या विभागामार्फत प्रत्यक्ष पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान द्यावे. लोकप्रतिनिधींनी अशा संकटात शेतकऱ्यांच्या बाजूने शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा आहे.
 - बापुराव राख, शेतकरी, वालूर. 

संपादन ः राजन मंगरुळकर