‘सोयाबीन’च्या नावाखाली पाम तेलाची सर्रास विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 food adulteration department

‘सोयाबीन’च्या नावाखाली पाम तेलाची सर्रास विक्री

कळमनुरी : सोयाबीन व पाम तेलाच्या किमतीमध्ये असलेली मोठी तफावत पाहता ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये बहुतांश व्यापाऱ्यांनी सोयाबीन तेल म्हणून पाम तेलाची सर्रास विक्री चालविली आहे. यामध्ये ग्राहकांची फसवणूक होत आहे. या प्रकाराकडे अन्न व भेसळ विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.

केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावर पाम तेलाची आयात केली आहे. परिणामी, मागील तीन महिन्यांपासून गगनाला भिडलेल्या खाद्यतेलाच्या भावामध्ये घसरण होत आहे. सोयाबीन तेलाचा १५ किलोचा डब्बा २,५७५ रुपयांवरून २,१८० पर्यंत येऊन ठेपला आहे. तर प्रति किलो १७० रुपयांवरून १३९ रुपयांपर्यंत सोयाबीन तेलाचे दर आले आहेत.

दुसऱ्या बाजूला पाम तेलाचा १५ किलोचा २५०० रुपये किंमत असलेल्या डब्बा १७०० रुपयांवर आला आहे. पाम तेलाचे भाव प्रति किलो १६६ वरून ११३ रुपयांवर आले आहेत.

सोयाबीन रिफाइंड तेल व पाम तेलाच्या कमी झालेल्या किमती त्यातही सोयाबीन व पाम तेलाच्या भावफलकामध्ये प्रति किलो २६ रुपये व पंधरा किलोच्या डब्यावर २५० रुपयांची असलेली तफावत पाहता अनेक व्यापाऱ्यांनी सोयाबीन तेलाच्या नावाखाली सर्रासपणे पाम तेलाची विक्री चालवली आहे. यामध्ये ग्राहकांची फसवणूक होत आहे. त्यातही अजून पर्यंत थंडी पडली नसल्यामुळे व्यापारी वर्गाचे चांगभले झाले आहे.

थंडी पडल्यानंतर पाम तेल घट्ट होते. त्यानंतर हे पाम तेल सोयाबीन तेल म्हणून विक्री करता येणार नाही. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी सोयाबीन रिफाइंड तेलाच्या नावाखाली पाम तेलाची सोयाबीन रिफाइंड तेल म्हणून विक्री करून आपले उखळ पांढरे करून घेणे सुरू केले आहे.

या सर्व प्रकाराकडे अन्न व भेसळ विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे. त्यातही मोठ्या प्रमाणावर तेलाचा वापर होत असलेल्या उपाहारगृह व सार्वजनिक कार्यक्रमाकरिता सोयाबीन तेल व पामतेलाच्या किमतीमध्ये असलेली तफावत पाहता पाम तेलाला पसंती दिली जात आहे.