esakal | सभापतींची निवड तर झाली पण पाच महिने उशिराने... 
sakal

बोलून बातमी शोधा

baithak

हिंगोली येथील जिल्हा परिषदेत विषय सभापतींच्या निवडीसाठी बोलावलेल्या विशेष बैठकीस उपस्थित जिल्हा परिषद सदस्य.

सभापतींची निवड तर झाली पण पाच महिने उशिराने... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची शुक्रवारी (ता.तीन) विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत विषय सभापतीपदाच्या निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यात शिक्षण सभापतीपदी रत्नमाला चव्हाण तर कृषी व पशु संवर्धन सभापतीपदी बाजीराव जुमडे यांची बिनविरोध निवड झाली. 

येथील जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात शुक्रवारी (ता.तीन) जिल्हा परिषदेची तहकूब झालेली विशेष सर्वसाधारण जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली. या वेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष मनीष आखरे, सीईओ राधाबीनोद शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी आदींची उपस्थिती होती. 

हेही वाचा - हिंगोलीत उभारली जाणार सुंदर शिल्पे

शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण, कृषी सभापती बाजीराव जुमडे 
फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेली सभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यात लॉकडाउन, संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे तब्बल पाच महिन्यानंतर शुक्रवारी सामाजिक अंतर पाळत, सॅनिटायझर, थर्मलगनच्या साह्याने अधिकारी, पदाधिकारी, सदस्य यांची तपासणी करून सभागृहात सर्वांना सोडण्यात आले. त्यानंतर बरोबर एक वाजता सभेला सुरुवात झाली. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. तसेच पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या ठरावाचे वाचन करून नवीन विषय सभापतीपदांचे नावे जाहीर केली. या वेळी शिक्षण सभापतीपदी राष्ट्रवादीच्या रत्नमाला चव्हाण यांची तर कृषी व पशु संवर्धन सभापतीपदी काँग्रेसचे बाजीराव जुमडे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच आरोग्य व बांधकाम खाते उपाध्यक्ष मनीष आखरे यांच्याकडे देण्यात आले. 

हेही वाचा - परभणीत बाहेरगावाहून येताय; मग व्हावे लागणार होम क्वारंटाइन, अन्यथा...

अर्ध्या तासात बिनविरोध निवडी 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने जानेवारी महिन्यात निवड प्रक्रिया पार पडली. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात विशेष सभेत विषय समित्या व सभापती खाते वाटप होणे अपेक्षित होते. मात्र, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांनी कोरमअभावी ही सभा तहकूब केल्याने सभापतीपदाच्या निवडी बारगळल्या होत्या. त्यानंतर मात्र, कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने त्यास रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात होत्या. 

लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्याने सभा 
गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बैठका, सभा, घेण्यास बंदी घातल्याने या निवडी लांबणीवर पडल्या होत्या. त्यानंतर शासनाने लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्याने जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सामाजिक अंतर पाळत सभा, बैठका घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे तब्बल पाच महिन्यानंतर जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. एरवी आठ तास चालणारी सभा लॉकडाउन काळात केवळ अर्ध्या तासात बिनविरोध सभापतीच्या निवडी करीत गुंडाळली.