esakal | श्रीमंत मराठी जनतेच्या ओठी...
sakal

बोलून बातमी शोधा

Special article on Marathi language day

श्रीमंत मराठी जनतेच्या ओठी...

sakal_logo
By
डॉ. केशव देशमुख

नांदेड: मुळात प्रमाण असाे की बाेली, भाषा ही डावी उजवी ठरविता येत नाही. भाषेकडे पहाण्याचे आपले गंड हे मूळात डावे उजवे आपण ठरविले आहेत. ज्या मराठीचा जगात दहावा क्रमांक आहे आणि जी भाषा काेट्यवधी लाेकांच्या राेजच्या व्यवहाराची, भावना अभिव्यक्तीची भाषा आहे, ज्याप्रमाणे श्‍वास घ्यावा लागताे, ज्याप्रमाणे प्यायला पाणी लागतेच, तितकीच महत्त्वाची भाषा असते. हे ज्याच्या त्याच्या भाषेला लागू पडणारे तत्त्व आहे. मराठी अशा पातळीवर अव्वल, माेठी, व्यापक भाषा स्वाभाविकच आहे. लाेकभाषा सर्व्हेक्षण यातील एक निरीक्षण या ठिकाणी मुद्दाम नाेंदवावे असे आहे. ते असे : अत्यंत व्यापक भूप्रदेशांत अहिराणी नावाची बाेली बाेलणारे थाेडेथाेडके नव्हे तर एक काेटीच्या आसपास लाेक सांगितले जातात. शिवाय, एकट्या अहिराणी बाेलीच्या पुनः एकवीस बाेली - उपबाेली असल्यासंबंधीचे संशाेधन डाॅ. गणेश देवी यांनी जगासमाेर सादर केले आहे. बाेलीची ही श्रीमंत मराठी थेट जनतेच्या ओठांवर आहे !! आपण, ‘‘भाषा मरणार असा टाहाे फाेडणे’’ म्हणूनच फार महत्त्वाचे मला वाटत नाही.

भाषा काेणतीही असाे, भाषेला झळ जरूर पाेहचते. बाेली बाेलणाऱ्या समाजाच्या बाबतीत ते अधिक खरे आहे. लहान भूभाग, छाेटे जनसमूह यांच्यावर विशिष्ट अरिष्टं आली की, त्या जनसमूहाची भाषा संकटात सापडते हे सत्य आहे. शिवाय स्थलांतर, नाेकरीधंदा, उद्याेग, विविध आपत्ती, दुष्काळ, राेगराई, माेठेमाेठे प्रकल्प यांची उभारणी : यामुळे माणसांचे काफिले आज इथे, उद्या तिथे या न्यायाने प्रदेश साेडतात, गांवे साेडतात, आणि कुठेतरी दूरस्थळी आपली मुळं रुजवतात... अनिकेत हाेणं हा भाषा पातळीवर शाप असताे. नवा प्रदेश, नवे लाेक, नवा व्यवहार, नव्या भाषा अशावेळी आत्मसात कराव्या लागतात. शहरांच्या संपर्कामुळं माणूस बहुभाषिक सहज हाेऊन जाताे. एकूण भाषेच्या बाबतीत ही घडणारी गाेष्ट उत्तम आहे. पण असे असले तरी बाेलीचे त्याचे म्हणून जे स्थान असते; त्यावर परिणाम मात्र, हाेताेच हाेताे. त्यासाठी बाेलीला धरून असणारा समाज हाच बाेलीरक्षण आणि बाेली उपयाेग यांच्यासाठी जास्त सक्षम असताे आणि विधायक सुद्धा !

‘‘श्रीमंत मराठी’’ ही जनतेच्या ओठांवर आहे हे अमान्य करता येत नाही. एखादा खेडूत माणूस सरकारी कचेरीत साहेबांशी बाेलताना रांगड्या पण प्रवाही भाषेत बाेलताना आपण सहज पहाताे. आठवडे बाजारांत दाेन शेतकरी परस्परांशी बाेलताना बाेलीत आणि ओघवत्या धाटणीमध्ये बाेलतात. शेतांत श्रम करणाऱ्या महिला किंवा पुरुष गप्पा मारताना चर्चेचा सूर निखळ बाेलीत असताे. दवाखान्यात रांगेत उभा असणारा गावाकडचा आम आदमी बाेलताना त्याच्या मूळ आवाजात, मूळ बाेलीत बाेलताे किंवा बस-रेल्वे प्रवासात गावाकडची माणसं हवापाणी, सुखदुःखाची चर्चा त्यांच्या स्वतःच्या गांवभाषेत करतात. त्यावेळी मराठी बाेलीचे वजन चटकन कळते. भाषेचा प्रवाहीपणा ध्यानात लगेच येऊन जाताे. शिवाय, बाेलीची प्रभावक्षमता तसेच बाेलीची परिणामकारकता अशा संवादांमधून एेकणाऱ्यांचे कान-मन वेधून घेते. बाेलीभाषेची ही खरी मूल्यगर्भता आहे आणि बाेलीभाषेची हिच खरीखुरी श्रीमंती आहे. याउलट नाटकी, कृत्रिम, नाकाेच्चारी भाषेची अशावेळी आपणास चीडच येऊ लागते. म्हणूनच डाॅ. गणेश देवी यांच्या ‘‘भाषेचे जतन करणे म्हणजे ती भाषा बाेलणाऱ्या समाजाचे जतन करणे हाेय’’. या विधानातील नेमकेपणा समजून घेतला पाहिजे.

भाषा रक्षणाचा विषय हा समाजरक्षणाची असताे. एखादा समाजसमूह दुर्लक्षून भाषेचे रक्षण हाेऊ शकत नाही. बाेलणारा हा सतत महत्त्वाचा ठरताे. त्याच्यानंतर लिहिणारा. लिहिणारा दुसऱ्या स्थानावर आहे हे पण लक्षात घेतले पाहिजे. बाेलीच्या संदर्भात काही निवडक दाखले नमूद करायला हवेत. उदा. संत गाडगेबाबांच्या कीर्तनाचे प्रधान माध्यम भाषा पण बाेलीभाषा राहिले. लाेकांच्या राेजच्या जगण्यातील बाेली शिवाय, संवादी आणि छाेट्या - छाेट्या प्रश्‍नं आणि उत्तरांत सामावलेली बाेली ते सतत वापरत असत. आणि महत्त्वाचे हे की, त्यांनी बाेलीचा वापर लाेकजागृतीसाठी, समाजजाेद्धाराकरिता केला. ‘‘बाेली व प्रबाेधन’’ अशा सूत्राचा उपयाेग करणारे वस्तूतः राष्ट्रीय पातळीवरील संत गाडगेबाबा हे एक महनीय आणि आदर्श सुधारक ठरतात. गेय पातळीवर परंतु सामाजिक - सांस्कृतिक विवेचन पातळीवर बहिणाबाई चाैधरी यांच्या गाणी, ओव्यांचा बाेलीभाषा म्हणून उल्लेख अत्यंत समर्पक स्वरूपात करता येताे.

हाच बाेलीचा धागा धरून लेखक आणि भाषा यादृष्टीने पुरुषाेत्तम बाेरकर (मेड इन इंडिया), रुस्तुम अचलखांब (गांवकी), प्रतिमा इंगाेले (अकसिदीचे दाणे), विठ्ठल वाघ (काया मातीत मातीत), सदानंद देशमुख (चारीमेरा), अशाेक काैतिक काेळी (कुंधा), रमेश इंगळे उत्रादकर (निशाणी डावा अंगठा), राजकुमार तांगडे (शिवार गाऱ्हाणं), अशाेक काेतवाल (दालदंडाेरी), गणपत भिसे (धुपात्री) किंवा नागराज मंजुळे, भाऊराव कऱ्हाडे, प्रवीण तरडे अशा गांवमाती - माणूसनाती - भूगाेलभाषा याकडे विशेष लक्ष देऊन मराठी चित्रपटांमध्ये भाषिक सांस्कृतिक प्राण भरणाऱ्या दिग्दर्शकांचा विचार करणे अगत्याचे आहे. या समकालीन एकूण सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक व वाड्.मयीन एकूण पर्यावरणात वर निर्देश केलेल्या जवळजवळ सर्व नामवंतांनी दिलेले याेगदान आणि केलेले काम गाैरव करावा अशा स्वरुपाचे नक्कीच आहे. मराठी आत्मकथनांची विशेषतः १९७० नंतरची एकूण मराठी परंपरा, बाेली, भाषा, समाज, संस्कृती या सर्व पातळीवर केवळ श्रेष्ठ अशीच ठरते.

बाेलीची मीमांसा करताना, बाेली जतनाचा विचार करताना आधी हा विचार करायला हवा की, ती बाेली बाेलणारा माणूस आणि त्याचा स्वतःचा, आतला आवाज हा सांभाळला गेला पाहिजे. माणूस मारून गाणी म्हणी राखण्यापेक्षा ज्याच्या त्याचा भूगाेल, भूगाेलावरचा माणूस, माणसांचा समूह, त्यांची म्हणून असलेली अभिव्यक्तीची साधन झालेली, संवादांचा प्राण बनलेली भाषा ही सुरक्षित केली पाहिजे. केवळ माणसांचे पवाडे गाऊन सगळं सांभाळता येत नाही. उलट ‘‘भाषेसह माणूस आणि माणसांसह भाषा’’ यांचा सांभाळ, त्यांचे रक्षण झाले पाहिजे. तरच श्रीमंत मराठी जनतेच्या आेठी आहे असे म्हणण्यात एकूण सारतत्व सामावलेले आहे असे स्वाभिमानानं म्हणण्यात अर्थ आहे.


 

loading image
go to top