
श्री. प्रसन्ना यांनी व्यापारी व नागरिकांनी उपस्थित केलेल्या स्थानिक प्रश्नांच्या अनुषंगाने बोलताना सांगितले की, शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व प्रश्न सुटतील असे नव्हे ; तरीही कॅमेऱ्याच्या दुरुस्तीसंदर्भात नगरपालिकेशी चर्चा सुरू आहे.
उमरगा (उस्मानाबाद ) : गेल्या तीन-चार वर्षापासून सायबर क्राईममध्ये वाढ झालेली दिसत असली तरी पोलिस विभाग सुध्दा तत्पर व अद्यायावत करण्यात आला आहे. ग्रामीण भागात घडणाऱ्या सायबर क्राईम विरूध्द पोलिस सक्षम असून त्याचा तपास योग्य दिशेने करण्याचा प्रयत्न पोलिस यंत्रणा करीत आहे. नागरिकांनी अशा गुन्हाबद्दल तक्रार नोंदणी करावी, असे आवाहन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक के.एम. मल्लीकार्जुन प्रसन्ना यांनी केले. उमरगा पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी श्री. प्रसन्ना यांनी शुक्रवारी (ता.चार) नागरिकांशी चर्चासत्राद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन, अपर पोलिस अधिक्षक संदिप पालवे, उपविभागीय पोलिस दिलीप टिपूरसे, पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव, सहाय्यक पोलिस निरक्षक सिद्धेश्वर गोरे, राष्ट्रवादी काँगेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार, भाजपाचे प्रदेश संताजी चालुक्य, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, नगरसेवक अतिक मुन्शी, संजय पवार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, कार्याध्यक्ष नितीन होळे, उपाध्यक्ष भागवत सोनवणे, सचिव हरिप्रसाद चांडक, बाळासाहेब कौलकर, दिलीप पोतदार, संतराम मूरजानी, मुस्लीम जमात कमिटीचे अध्यक्ष बाबा औटी, शमीम सास्तूरे, कलीम पठाण, निजाम व्हंताळे, याकूब लदाफ आदी उपस्थित होते.
श्री. प्रसन्ना यांनी व्यापारी व नागरिकांनी उपस्थित केलेल्या स्थानिक प्रश्नांच्या अनुषंगाने बोलताना सांगितले की, शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व प्रश्न सुटतील असे नव्हे ; तरीही कॅमेऱ्याच्या दुरुस्तीसंदर्भात नगरपालिकेशी चर्चा सुरू आहे. शहरातील ट्रॉफीकचा प्रश्न सोडवण्यासाठी समन्वयातून मार्ग काढावा. हॉकर्सच्या रोजीरोटीचाही विचार केला पाहिजे, त्यांना स्वतंत्र जागा मिळाली पाहिजे. व्यापाऱ्यांनीही साहित्य रस्त्यावर आणू नये, पादचाऱ्यांची सोय पाहिली जावी. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस यंत्रणा दक्षतेने काम पाहत आहे, त्याला नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असते.
यावेळी श्री. चिंचोळे, महेश पाटील यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सांगितल्या. राष्ट्रवादीचे प्रा.बिराजदार यांनी कोरोनाच्या काळात येथील पोलिस यंत्रणेने केलेले कार्य प्रशंसनीय आहे, परंतू अवैध दारूवर पायबंद घालण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे ते म्हणाले. श्री. औटी यांनी सामाजिक सलोख्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित असतो, पोलिसांशी समन्वय असते असे मत व्यक्त केले. पोलिस निरीक्षक श्री. अघाव यांनी आभार मानले.
तक्रारीचा निपटारा तातडीने व्हावा
नागरिकांच्या तक्रारीची नोंद घेताना पोलिसांनी तत्परतेने काम करावे. परस्परविरोधी तक्रारीची योग्य शहानिशा करावी. बैठकीच्या निमित्ताने संवाद साधता आला; तरीही काही अडचणी असतील तर थेट फोन करा असे श्री. प्रसन्ना यांनी सांगितले.
संपादन - सुस्मिता वडतिले