मराठवाड्यातील देशी गोसंवर्धन कार्यास मिळणार गती

कैलास चव्हाण
Wednesday, 26 February 2020

देवणी आणि लाल कंधारी गोवंश संवर्धनाच्या बळकटीकरण व आधुनीकरणाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतर परभणीच्या गो-पैदास केंद्राने देवणीचा प्रस्ताव सादर केला आहे.

परभणी : मराठवाड्यात आढळुन येणाऱ्या लालकंधारी, देवणी गोवंशाचा जनुकीय अभ्यास करुन संवर्धन कामास बळकटी देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संकरीत गो-पैदास प्रकल्प व नागपूर पशुवैद्यक व विज्ञान महाविद्यालय अंतर्गत परभणी येथील पशुविज्ञान महाविद्यालयाने बळकटीकरण व आधुनीकरणाचे स्वतंत्र प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केले आहेत. त्यातून देशी गोसंवर्धन कार्यास गती मिळणार आहे.

मराठवाड्यात देवणी, लाल कंधारी हे गोवंश शुध्द देशी म्हणून प्रसिध्द आहेत. तसेच कामाला आणि दुग्ध व्यवसायास उपयुक्त असल्याने अनेक वर्षापासून या दोन जातीच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. मराठवाड्यातील विविध वैशिष्टपूर्ण जनावरांचे वंश टिकण्यासाठी त्यांच्या जनुकीय रचनांचा अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी नुकतीच औरंगाबाद येथे बैठक घेऊन त्यात सादर प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा व पहा - Video: परभणीत १४ बटूंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा

अग्र मानांकने मिळवणारा गोवंश
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात १९७५ मध्ये देवणी जातीची शास्त्रशुध्द पैदास, संवर्धन व संकर करण्यासाठी गो-पैदास प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला आहे. परभणीतील गो-पैदास केंद्रात मागील काही वर्षात शुध्द देवणी जातीचे एक हजार ७०० जनावरांची पैदास करुन लिलावाद्वारे शेतकऱ्यांना विक्री केली आहेत. सध्या केंद्रात १५० गाय-बैल आहेत. डोंगराळ भागात ४२ ते ४४ अंश तापमानात न थकता ओढ काम करणारा गोवंश आहे. तसेच दुधासाठी उपयुक्त आहे. तर नागपूर पशुवैद्यक व विज्ञान महाविद्यालय अंतर्गत परभणी येथील पशुविज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांच्या नेतृवाखाली लाल कंधारी गोवंश संवर्धनाचे काम केले जात आहे. दुष्काळात तसेच तीव्र उन्हाळ्यामध्ये सुद्धा तग धरुन राहणारा आणि सर्वसाधारण मेहनतीवर जास्त काळ दूध देणारा तसेच राष्ट्रीय स्तरांवरील पशुप्रदर्शनांमध्ये अग्र मानांकने मिळवणारा गोवंश म्हणून लालकंधारी गोवंशाचीच ओळख आहे.

हेही वाचा -मराठवाड्यात एक मार्चला पावसाची शक्यता

दोन्ही  प्रस्ताव सादर
देवणी आणि लाल कंधारी गोवंश संवर्धनाच्या बळकटीकरण व आधुनीकरणाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतर परभणीच्या गो-पैदास केंद्राने देवणीचा प्रस्ताव सादर केला आहे. देवणी गोवंशाची अनुवंशिकता तपासण्यासाठी अण्विक व्यक्तीचित्रण तसेच रंगसुत्र मांडणीद्वारे शुध्द प्रजा निर्माण करणे शक्य होणार आहे. देवणी प्रजातीची देशातील एकमेव केंद्रीय कळप स्थापन
करण्याचा मुळ उद्देश आहे. संवर्धनासाठी जातीवंत वळु, विर्य नलिका, उच्च उप्तादनक्षम गायी शासकीय यंत्रणेद्वारे पुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच पशु वैद्यकीय व विज्ञान महाविद्यालयाने देखील लाल कंधारीच्या संवर्धनासाठी बळकटीकरणाचा प्रस्ताव सादर केला आहे.

औरंगाबाद विद्यापीठाची होणार मदत
देशी गोवंशाचा जनुकीय अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनुकीय अभ्यास केंद्राची मदत होणार आहे.जनावरांचे रक्त तपासणी,जनुकीय अभ्यास यासाठी हे केंद्र मदत करणार आहे.

 विभागीय आयुक्तांनी पुढाकार
देशी गोवंशच्या संवर्धनासाठी विभागीय आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. परभणीत देवणी गोवंशावर संवर्धनाचे  काम सुरु आहे.आता त्या कामाला बळकटीकरण येणार असून जास्तीत जास्त सख्येने शेतकऱ्यांना हा वंश देता येणार आहे.
डॉ. दिनेशसिंह चौहान, प्रभारी अधिकारी संकरीत गो-पैदास प्रकल्प
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Speed ​​will be achieved in the country