महावितरण विद्युत मंडळाच्या नावाने दुष्काळी अनुदान; शेतकऱ्यांचे खाते नंबरही चुकीचे, महसूल विभागाचा अनागोंदी कारभार

विठ्ठल देशमुख
Monday, 25 January 2021

यंदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.

सेनगाव (हिंगोली) : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले असून त्यामध्ये चक्क महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या नावाने ९२०० रूपये दुष्काळी अनुदान आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर दोन हजाराहून शेतकऱ्यांचे खातेनंबरही चुकीचे टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे.

यंदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने दुष्काळी अनुदान जमा करण्यात आले असून जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील सूचना फलकावर लाभार्थ्यांच्या याद्या लागल्या आहेत. यासाठी तालुका भरातील शेतकरी आपले नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले पाहण्यासाठी मध्यवर्ती बँकेसमोर आपले नाव पाहण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. अनेकांची नजर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या आलेल्या दुष्काळी अनुदानावर पडली असताना. त्यांच्या गट नं. ९५१, ९५२, ९५५ खाते नं.००३२११००२२० यावर ०.९२ हेक्टरसाठी ९२०० रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तसेच ह्या याद्यांमध्ये दोन हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे खाते नंबर सुध्दा चुकीचे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्याने शेतीचा पंचनामा करण्यासाठी निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये महसूल विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांचे खाते नंबर चुकीचे आल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदानाची आलेली रक्कम जमा करायची कशी? असा प्रश्न मध्यवर्ती बँकेसमोर उपस्थित होत आहे. सेनगाव येथील महसूल विभागाच्या ढीसाळ कारभाराचा शेतकरी वर्गातून निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी व सुज्ञ नागरिकांतून जोर धरु लागली आहे.

सध्या शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान जाहीर झाले असून जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये लावण्यात आलेल्या यादीवर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे नाव आले व शेतकऱ्यांचे चुकीचे खाते नंबर आल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या संपूर्ण प्रकाराची योग्य चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात येईल.
- जिवनकुमार कांबळे, तहसीलदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state government has announced drought subsidy to provide relief to farmers due to heavy rains in Sengaon taluka