पुलावरच्या दगडांमुळे चारचाकी वाहनांना अडथळा 

अच्युत जोगदंड 
Sunday, 15 November 2020

नांदेडहून पूर्णा जाणाऱ्या रस्त्यावर गौर गावाजवळील पुलाच्या दोन्ही बाजूने मुरूम टाकून मजबुती न केल्याने दोन ते तीन फुटांचे खड्डे झाले आहेत. यामुळे चारचाकी वाहनाला अडथळा निर्माण होत आहे. रविवारी असाच एक प्रकार घडला असता एका कारला अडथळा निर्माण झाल्याने पुलावर वाहनाच्या दोन्ही बाजूने रांगा लागल्या होत्या. दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसात वाहनधारकांची या रस्त्याने जाताना गैरसोय होत असल्याने नाराजी पसरली आहे.

पूर्णा ः पूर्णा ते नांदेड रोडच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान, रस्त्यातील छोट्या-मोठ्या नद्यावरील पुलाचे काम झाले. परंतु, गौर गावाजवळील पुलाच्या दोन्ही बाजूने मुरूम टाकून मजबुती न केल्याने दोन ते तीन फुटांचे खड्डे झाले आहेत. दिवाळीसाठी आपापल्या गावी जाताना रविवारी (ता.१५) दोन ते चार तास वाहनांच्या नांदेडकडून व पूर्णेकडून दोन्ही बाजूने रांगा लागल्यामुळे नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले होते. 

पूर्णा-नांदेड हे अंतर २९ ते ३० किलोमीटर आहे. यातील नांदेड-लिंबगावपर्यंत रस्ता एकेरी आहे; मात्र तो चांगल्या अवस्थेत आहे. लिंबगाव ते चुडावा खड्डेयुक्त तर चुडावा ते गौर रस्ता उखडलेल्या अवस्थेत आहे. गौर ते पूर्णा हा मार्ग चांगला झाला आहे. अनेक ठिकाणी खोदकाम आणि दगड रस्त्यावर अंथरल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेत प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर वाहने पंक्चर होण्याचे प्रमाणही वाढले आहे. नांदेड-परभणी जाण्यासाठी अनेकजण याच रस्त्याचा पर्याय स्वीकारत आहेत. पुर्णा ते परभणी हा रस्ता कात्नेश्वर मार्गे नांदगावकडून जवळचा आणि चांगल्या स्थितीत असल्याने अर्धा रस्ता टापोटाप तर बाकी रस्त्याचा डोक्याला ताप अशी गत झाली आहे.  

हेही वाचा - चांगली बातमी : उन्नती महिला बचत गटाची भरारी, छोट्या व्यवसायातून केली जातेय लाखोची उलाढाल

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष  
पूर्णा-नांदेड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले तेव्हापासून काही ठिकाणी चार फूट खोदून मटेरियल टाकून मजबूत काम केले जाते. परंतु, साठ टक्के खोदण्याचे काम करत असल्याने नर्हापूर, गौर, चुडावा आदी ठिकाणी केलेल्या पुलाच्या कामामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने काम बोगस होत आहे. 

हेही वाचा - पालकमंत्र्यांना वेळ मिळेना..धरणे शंभर टक्के भरली, पण नियोजनचा अभाव, ऊस व रब्बीच्या पेरण्या लांबल्या.

शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून तक्रारी केल्या
अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून तक्रारी केल्या. मात्र, यासाठी लोकप्रतिनिधी कोणीही जातीने लक्ष देत नसल्याने केटीएलचे गुत्तेदार कुणालाही मोजायला तयार नाहीत. हजारो वाहनचालकांना सणासुदीला रस्त्यावर राहायची वेळ आल्याचे चुडावा येथील नारायण ऊर्फ बाळू देसाई यांनी सांगितले.

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stones on the bridge obstruct four-wheelers, Parbhani News