पोखर्णी नृसिंह फाटा येथे रास्ता रोको; शेतकरी विरोधी कायदे रद्दची मागणी

गणेश पांडे
Saturday, 6 February 2021

पोखर्णी सह परिसरातील सुरपिपंरी, भारस्वाडा, वडगाव,  पेगरगवहान, उमरी, पिंपळगाव, बाभळगाव, बोरवंड, रोडा, ताडपागरी, इंदेवाडी, आंबेटाकळी आदी गावातील शेकडो शेतकऱ्यांनी दुपारी १२ ते १ वा दरम्यान परभणी- गंगाखेड महामार्ग आडवून रस्ता रोको आंदोलन केले

परभणी ः अडीच महिण्यापासून दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जाहीर पाठींबा देण्यासाठी शनिवारी (ता.सहा)  पोखर्णी नृसिंह फाटा  (ता.परभणी) येथे सुकाणू समितीच्या वतीने शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पोखर्णी सह परिसरातील सुरपिपंरी, भारस्वाडा, वडगाव,  पेगरगवहान, उमरी, पिंपळगाव, बाभळगाव, बोरवंड, रोडा, ताडपागरी, इंदेवाडी, आंबेटाकळी आदी गावातील शेकडो शेतकऱ्यांनी दुपारी १२ ते १ वा दरम्यान परभणी- गंगाखेड महामार्ग आडवून रस्ता रोको आंदोलन केले. शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावेत, अशी मागणी करीत केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या सहभाग नोंदवला. शेतकरी संघटनांची सुकाणू समिती परभणीचे निमंत्रक  विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विलास बाबर यांच्यासह बंडू पाटील, गोविंद भांड, वसंतराव पवार, विकास दळवे, माणिकराव आव्हाड, रुस्तुम संसारे, गोविंद भोसले, कमलाकर बाबर, दिगंबरराव गमे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  रस्त्यावर उतरून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला.

मागील ७१ दिवसांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांशी व नेतृत्वाशी संवादातून प्रश्न मार्गी काढणे हे सरकारचेच कर्तव्य आहे. परंतु तसे न करता शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काटेरी ताराची कुंपणे उभारली, खंदक खोदणे, खिळे बसवणे हे सरकारचे र्लज्जपणाचे लक्षणं शेतकरी खपवून घेणार नाहीत हा इशारा देण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला.

- विलास बाबर, सुकाणू समिती, परभणी

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop the road at Pokharni Nrusinha Fata parbhani news