काय आहे मिस्ड्‌ कॉल लव्ह? अशी होते तरुणींची फसवणूक

प्रतीकात्मक छायाचित्र.
प्रतीकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद, : मोबाईल स्वस्त झाले अन्‌ शाळकरी मुला-मुलींपासून सर्वांकडे मोबाईल आले. यातून सायबर क्राईममध्ये 'मिसड्‌ कॉल लव्ह' किंवा 'रॉंग नंबर लव्ह' या गुन्ह्याची भर पडली आहे. रिचार्ज करण्यासाठी गेल्यानंतर किंवा गर्दीच्या ठिकाणी बोलताना मोठ्याने स्वत:चा सांगितलेला मोबाईल क्रमांक 'मिस कॉल लव्ह' किंवा 'रॉंग नंबर लव्ह'च्या जाळ्यात तरुणी, महिलांना ओढू शकतो. यासाठी सावधानता बाळगणे आवश्‍यक असल्याचे सायबर क्राईमच्या अभ्यासकांनी सांगितले. 
 
प्रिपेडसाठी सीमकार्ड रिचार्ज करणे आलेच. रिचार्ज करणाऱ्या दुकानांत महाविद्यालयीन तरूणाईच जास्त संख्येने दिसतात. महिलांची संख्या तशी कमीच असते. सीमकार्ड रिचार्ज करायला जातात, तेव्हा काही जण एखाद्या मुलीचा फोन नंबर घेऊन ठेवतात आणि सध्या आवश्‍यक बॅलेन्स नाही, बॅलेन्स आले की मी रिचार्ज करतो, असे सांगून पैसे ठेवून घेतात. काही वेळानंतर रिचार्ज करणारा मुलीच्या सीमकार्डावर तिने दिलेल्या पैशापेक्षा जास्तीचे रिचार्ज करतो आणि फोन करुन चुकून जास्तीचे रिचार्ज झाल्याचे सांगतो. राहिलेले पैसे पुढच्यावेळेस द्या, असे सांगून देतो. यातुन हळूहळू संवाद वाढत जातो. संपर्क वाढवत त्याचे रुपांतर प्रेमात होते आणि मग फसवणुकीत. 
दुसऱ्या प्रकारात सीमकार्ड रिचार्ज करायला जाणारी तरुणी दुकानात गेल्यानंतर स्वत:चा नंबर सांगते, त्यावेळी दुकानात बसलेले किंवा आजूबाजूला असलेले इतर टवाळखोर तिचा नंबर त्याचवेळी टाईप करुन घेतात. तरुणी निघून गेली की मिस कॉल देतात. दोन तीन वेळा मिस कॉल आल्यानंतर साहजिकच तरुणी रिकॉल करते आणि तिथेच घात होतो. हळूहळू संवाद वाढत त्यांचे मिस कॉल लव्हच्या जाळ्यात ओढणे सुरू होते.

मग तरुणी किंवा महिलांचे फोटो मागवून घेणे, त्यात छेडछाड करुन ब्लॅकमेल करणे असे प्रकार सुरु होतात. अशा मिसकॉल लव्ह किंवा रॉंग नंबर लव्हमुळे अनेकींचे जीवन उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारचे सायबर क्राईम आपल्या अवतीभवती घडत असते. मात्र, भितीपोटी व बदनामीपोटी अशी प्रकरणे पुढे येत नाहीत. यासाठी सावधानता बागळणे हाच एक उपाय असल्याचे मत जाणकारांनी व्यक्‍त केले आहे. आपल्या मोबाईलवर येणारे संदेश, रॉंग कॉल हाताळताना सावधगिरी बाळगली पाहीजे. 

 
तज्ज्ञ म्हणतात... 

 सायबर क्राईमसंदर्भातील अभ्यासक डॉ. संजय शिंदे म्हणाले, की मिस कॉल देउन प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणुक केली जाते. शहरातील 2017-18 मधील एक घटना आहे. एकाच अपार्टमेंट मध्ये राहणारे 17 वर्षाचे मुलगी-मुलगा आणि तिसरा 21 वर्षाचा. त्यांनी मुलीचा नंबर मिळवला. तिला मिस कॉल देउन तीच्याशी ओळख वाढवली आणि नंतर एक-दोन फोटो पाठविण्यास सांगीतले. भावनेच्या भरात मुलीने एक-दोन फोटो पाठवल्यानंतर तिचा चेहरा एका न्यूड मॉडेलच्या चेहऱ्यावर लावला, याला सायबर क्राईमच्या भाषेत "मोफींग' म्हणतात. नंतर तिला ब्लॅकमेल करणे सुरु केले. दहा हजार रुपये दे किंवा संबंध ठेव, असे तिला धमकावले. त्यावर तिने संबंध ठेवणार नाही पाच हजार रुपये देते असे सांगून तिने औरंगपुऱ्यात एका ठिकाणी 5 हजार रुपये दिले. तिने तो फोटो डिलिट करण्यास सांगितले मात्र त्याने तिला फोटो डिलीट करण्यासाठी सोनेरी महल परिसराकडे नेले आणि तिथे मित्रासह बलात्कार केला होता. नंतर हा प्रकार पोलिसात गेल्यानंतर एका मुलाला बालसुधारगृहात पाठवले तर एकाला शिक्षा झाली आहे. असे सायबर क्राईम थांबवणे कठीण असले तरी फक्‍त प्रत्येकाने अलर्ट राहणे हा त्यावर एकच उपाय आहे. तसेच असा प्रकार कोणा मुलीच्या किंवा महिलेच्या बाबतीत घडला असेल तर याची जास्त फसवणूक होण्यापूर्वीच पोलिसात तक्रार दिली पाहीजे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com