esakal | संचारबंदीचे कडेकोट पालन, बाजारपेठ निर्मणुष्य ; कुठे ते वाचा... 
sakal

बोलून बातमी शोधा

klm

कळमनुरी शहरात संचारबंदी लावल्यानंतर बाजारपेठेत सोमवारी शुकशुकाट होता. संचारबंदी काळात प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, यासाठी पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली.

संचारबंदीचे कडेकोट पालन, बाजारपेठ निर्मणुष्य ; कुठे ते वाचा... 

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी ः येथे सोमवारपासून (ता.२९) संचारबंदी लावल्यानंतर बाजारपेठ व सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. संचारबंदी काळात प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, यासाठी पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली.

काझी मोहल्ला भागात कोरोना आजाराचे रुग्ण आढळून आल्याने खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पाच दिवसांची संचारबंदी लावली आहे. त्‍यामुळे सोमवारी व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले. मेडिकल व खासगी रुग्णालये वगळता सर्व आस्थापना बंद होत्या. यामुळे शहरात शुकशुकाट होता. 

येणाऱ्या - जाणाऱ्यांची चौकशी
अंमलबजावणीसाठी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे लक्ष ठेवून आहेत. तसेच पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, एस.जी.रोयलावार यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरात फेरफटका मारून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना दम दिला तर नवीन बसस्थानक, जुने बसस्थानक, चौक बाजार, विश्रामगृह या भागात पोलिसांचे पथक नेमून शहरात येणाऱ्या - जाणाऱ्यांची चौकशी करून विनाकारण व मास्क न बांधणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करीत आहेत. 

हेही वाचा - Video: युवक काँग्रेसची परभणीत पेट्रोलपंपासमोर निदर्शने

नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी बैठक
कळमनुरी ः शहरातील काझी मोहल्ला भागात कोरोनाचे सात रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शंभर टीम तयार केल्या आहेत. आरोग्य तपासणीच्या पूर्वतयारीसाठी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी रविवारी (ता. २८) बैठक घेऊन संबंधिताना जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.

हेही वाचा - टंचाईच्या कामांना मरगळ, ११६ पैकी सहा कामे पूर्ण

बुधवारी शहरातील सर्व नागरिकांची तपासणी
काजी मोहल्ला भाग कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. खबरदारी म्‍हणून प्रशासनाने पाच दिवसांची संचारबंदी लावली आहे. मात्र, आजाराचे निदान होण्यापूर्वी या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या शहरातील इतर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. बुधवारी (ता. एक) एकाच दिवसात शहरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता आरोग्य विभागातील कर्मचारी, महसूल विभाग, पोलिस कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर अशा दोनशे कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या शंभर टीम तयार करण्यात आले आहेत. या टीममधील सदस्यांकडून शहरामधील प्रत्येक घरी भेटी देऊन कुटुंबामधील सदस्यांना सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, परजिल्ह्यातून आले असल्यास त्या नोंदी घेण्यात येणार आहेत. तसेच ६० वर्षांच्या वर असलेल्या महिला, पुरुषांच्या स्वतंत्र नोंदी घेऊन मधुमेह, रक्तदाब, पॅरालिसिस, कर्करोग आदी आजार आहेत का, याची संकलित केली जाणार आहे. 

विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती 
शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यापूर्वी रविवारी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी या संदर्भात बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, मुख्याधिकारी उमेश कोठीकर, सहायक गटविकास अधिकारी श्री. आंधळे, पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद मेने, डॉ. महेश पंचलिंगे, नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते यांच्यासह सर्व पालिका सदस्यांची उपस्थिती होती.