रस्त्याच्या मागणीसाठी विद्यार्थी व प्रहार संघटनेचा रस्तारोको

अनिल शेटे
बुधवार, 4 जुलै 2018

रस्ता दुरूस्त करण्यात यावा या मागणीसाठी बुधवारी (ता. 4) विद्यार्थी व प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने सकाळी 9 ते 11 यावेळात राज्यमार्गावर दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
 

गंगाखेड - खळी ते मैराळसावंगी (ता. गंगाखेड जि. परभणी) हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असुन या रस्ताने अवैध अवजड वाळू वाहतूकीच्या वाहनाने हा रस्ता अधिकच खचला आहे. सदरील रस्ता दुरूस्त करण्यात यावा या मागणीसाठी बुधवारी (ता. 4) विद्यार्थी व प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने सकाळी 9 ते 11 यावेळात राज्यमार्गावर दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

परभणी-गंगाखेड राज्यमार्गावरील खळी पाटीवर रस्ता रोको आंदोलनादरम्यान दोन किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजुनी वाहतूक खोळंबली होती. यावेळी रस्ता दुरूस्त करण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता केदार सोनवणे यांनी दिले. त्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. सुरेश इखे, रमेश पवार, ओमकार पवार, शिवाजी जाधव, रावसाहेब बचाटे, प्रदीप गौरशेटे, गणेश बारगिरे, संतोष जाधव, चामदेव सोन्नर, विजय सोन्नर, प्रल्हाद सुरवसे, कल्याण लाडे आदीसह प्रहार जनशक्ति पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आदी आंदोलन सहभागी होते. 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Student and Prahar unions agitation for road