esakal | बीड : प्रवेश शुल्क भरण्यास पैसे नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

बीड : प्रवेश शुल्क भरण्यास पैसे नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

- माळेगाव येथील रोहन भगवान गव्हाणे याने केली आत्महत्या.

- बारावीला प्रवेश घेणे शक्य होत नसल्याने नैराश्येतून केले विषप्राशन. 

बीड : प्रवेश शुल्क भरण्यास पैसे नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

sakal_logo
By
रामदास साबळे

केज : तालुक्यातील माळेगाव येथील रोहन भगवान गव्हाणे या शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केली. शाळा-महाविद्यालय सुरू होऊन दोन महिने उलटले तरीही बारावीला प्रवेश घेणे पैशांअभावी शक्य होत नाही. त्यामुळे निराश होऊन त्याने विषप्राशन करून आत्महत्या केली.

माळेगाव येथील भगवान गव्हाणे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. दोन एकर शेती असणारे हे कुटुंब मोलमजूरी करून मिळणाऱ्या तुटपुंज्या मोबदल्यात कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यातून काटकसर करून मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवत असत. मात्र, मागील वर्षापासून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती उभी खरीपाची पिके करपली आहेत. अशा भयानक परिस्थितीत शिक्षणाचा खर्च भागविणे अवघड झाल्याने विद्यार्थ्याने निराश होऊन टोकाचे पाऊल उचलले आहे.

बिकट परिस्थितीत आई-वडील मोलमजूरी करुन कुटुंबाचा अर्थिक भार सांभाळून लहान भावाचा लातुरचा शिक्षणाचा खर्च भागवतात. त्यामुळे आपण त्यांना शैक्षणिक शुल्क भरण्याकरीता पैसे कसे मागायचे? या विचाराने निराश झालेल्या रोहनने शेवटी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. यामुळे त्याच्या कुटूंबावर हा दु:खाचा प्रसंग ओढावला आहे.

दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्याच्या कोवळ्या जीवाचा बळी गेला आहे. रोहनसारख्या निरागस मुलांवर आत्महत्या करण्यासारखा प्रसंग इतरांवर ओढावला जाऊ नये, यासाठी प्रशासकीय स्तरावर विचार विनिमय होऊन मार्ग काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, रोहनच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलाचा पहिला शैक्षणिक बळी गेलेल्या रोहनच्या प्रतिमेस गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. 

loading image
go to top