विद्यार्थी-महिलांचा तलावातून चप्पूवरून धोकादायक प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dangerous Journey on Chappu

तलाव झाला, बारमाही पिके पाण्याखाली आली. दूध - दुभते वाढले. पण, तलावामुळे वस्तीवरील लोकांचा रस्ता पाण्याखाली गेला.

Dangerous Journey : विद्यार्थी-महिलांचा तलावातून चप्पूवरून धोकादायक प्रवास

बीड - तलाव झाला, बारमाही पिके पाण्याखाली आली. दूध - दुभते वाढले. पण, तलावामुळे वस्तीवरील लोकांचा रस्ता पाण्याखाली गेला. अनेक डबडबत्या तलावातील पाण्यातून चप्पूवरून धोकादायक प्रवास केल्यानंतर गणेश मंडळाला किव आली आणि त्यांनी दोन तराफे दिले. मात्र, विघ्नसंतोषींनी तराफेही जाळून टाकले. आता पुन्हा वस्तीवरील मुले व महिलांचा चप्पूवरून धोकादायक प्रवास सुरु झाला आहे. हा संघर्ष करावा लागतोय, सहाशेंच्या घरात लोकसंख्या असलेल्या सौताडा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या शिंदेवस्तीकरांना.

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी चप्पू उलटून मुले व महिला पाण्यात पडल्या. सुदैवाने दुर्घटना घडली नाही. आता शासन - प्रशासन असे काही घडल्यानंतरच उपाय योजना करणार का? असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात येत आहे. सौताडा ग्रामपंचायत हद्दीत शिंदेवस्ती आहे. तलाव झाल्याने डोंगराच्या पल्ल्याड असलेल्या शिंदेवस्तीचा रस्ता तलावात गेला. दुसरा रस्ता एकाने अडविला आहे. विशेष म्हणजे हा सार्वजनिक रस्ता असतानाही अडविण्याची हिंमत करणाऱ्यापुढे पाटोदाच्या महसूल प्रशासनाने नांग्या का टाकल्या असा प्रश्न आहे.

दरम्यान, काही वर्षे असा चप्पूवरून धोकादायक प्रवासात विद्यार्थी व महिलांचे अपघातही घडले. सुदैवाने दुर्घटना घडलेली नाही. मात्र, हा प्रकार माहीत झाल्यानंतर मुंबईच्या बांद्रेकरवाडी गणेश मंडळाने दीड वर्षांपूर्वी अडीच लाख रुपयांचे दोन तराफे दिले. मात्र, रस्त्याचा प्रश्न गंभीर असल्याने ग्रामस्थांनी रस्त्यासाठी मतदानावर बहिष्काराची घोषणा केली. ग्रामपंचायतीची निवडणूक सुरु आणि ही घोषणा होताच मध्यरात्री तराफे इंधन ओतून जाळून टाकण्यात आले. यात विघ्नसंतोषी लांबचा नाही हे नक्की. या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असला तरी तराफे जळाल्यामुळे ग्रामस्थांचा पुन्हा चप्पूवरून धोकादायक प्रवास सुरु झाला. यात दुसऱ्याच दिवशी चप्पू पलटून मुले व महिला पाण्यात पडल्या. पण, कुठलीही हानी झाली नाही. मात्र, शासन - प्रशासन नावाच्या यंत्रणेला काही हानी झाल्यानंतरच या ग्रामस्थांना रस्ता द्यायचाय का? असा प्रश्न आहे.

टॅग्स :studentlakewomenJourney