संमेलनाध्यक्षांच्या वर्गात शिक्षक झाले विद्यार्थी!

अरूणा ढेरे
अरूणा ढेरे

लातूर : शिक्षण हा मुलांसाठी सोन्याचा पिंजरा ठरू नये. या पिंजऱ्याबाहेर जाऊन शिक्षकांना मुलांशी संवाद साधता आला पाहिजे. भाषा कधी तलवार बनते, तर कधी फुलासारखी कोमल बनते. त्यातील बारकावे मुलांना सांगता आले पाहिजेत. शिक्षकांनी आपल्या विषयाकडे गांभीर्याने पाहिले तरच मुलांमध्ये भाषेची आणि साहित्याची गोडी वाढेल, असे मत मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. 


राज्याच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन तेथील शिक्षकांशी कार्यशाळेच्या माध्यमातून संवाद साधण्याचा निर्णय डॉ. ढेरे यांनी घेतला आहे. त्याची सुरवात लातूरपासून झाली. श्री केशवराज शैक्षणिक संकुलात बुधवारी (ता. 28) मराठी भाषेच्या शिक्षकांची कार्यशाळा झाली. नारायण सुर्वे, ग. ह. पाटील, भालचंद्र नेमाडे, अरुण कोल्हटकर, दासू वैद्य अशा वेगवेगळ्या पिढीतील लेखक-कवींच्या लेखनातील बारकाव्यांची उदाहरणे देत डॉ. ढेरे यांनी त्यांच्या लेखनातील सौंदर्य शिक्षकांसमोर उलगडले. त्यामुळे "मराठीचा तास' उत्तरोत्तर रंगत गेला. या तासाला शिक्षक विद्यार्थ्यांच्या भूमिकेत गेले, हाती वही घेऊन गांभीर्याने टिपणेही काढली. प्रसिद्ध लेखिका नीलिमा गुंडी, संस्थेचे कार्यवाह जितेंद्र चापसी उपस्थित होते. 


डॉ. ढेरे म्हणाल्या, "आपण शिक्षणाची एक चौकट ठरविली आहे. त्याबाहेर सहसा जात नाही. मोकळेपणाने शिकवत नाही. शिक्षकांनी तसा प्रयत्न केला पाहिजे. याचा अर्थ पाठ्यपुस्तकांपासून दूर जायचे, असा नाही. पाठ्यपुस्तके गृहपाठ, परीक्षा हे मुलांना जाचक वाटू नयेत, यासाठी मुलाचे बोट धरून त्याला विषयापासून आशयापर्यंत घेऊन जाता आले पाहिजे. त्यासाठी आधी आपण संबंधित विषयाचे आकलन करून घेणे महत्त्वाचे आहे. कवी त्याच्या कवितेते शब्दांची निवड कशी करतो, रचनेचे घाट कसे असतात, हे मुलांना सांगता आले पाहिजे.' 


गुंडी म्हणाल्या, "शिक्षकांनी आळस झटकून आपल्या विषयाची तयारी करायला हवी. आपले शिकवणेच नव्हे, तर वागणे, देहबोलीसुद्धा मुलांना खूप काही शिकवून जाणारी असते. त्यामुळे शिकविण्याआधी शिक्षकांनी मुळापासून तयारी करायला हवी. भाषा हे शिवधनुष्य असून, ते पेलता आले पाहिजे. त्यासाठी वाचन, चिंतन महत्त्वाचे आहे. वाचताना सतत प्रश्न पडले पाहिजेत. शब्दकोश जवळ घेऊन त्याची उत्तरेही शोधली पाहिजेत. शिक्षकांच्या अशा प्रेमातून भाषाप्रेमी विद्यार्थी घडण्यास मदत होईल.' 



कविता ही कागदावर दिसते तेवढीच नसते. तिचे अवकाश समजून घेता आले पाहिजे. कविता कधी प्रश्नांच्या स्वरूपात असते, कधी नाट्य, चित्र, संगीताच्या स्वरूपातही पाहायला मिळते, कधी शब्दांचे नृत्यही असते. हे शिक्षकांना मुलांपर्यंत पोचविता आले पाहिजे. 
- डॉ. अरुणा ढेरे, मराठी संमेलनाच्या अध्यक्षा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com