
Success story : आधी PSI नंतर तहसीलदार अन् आता पोलिस उपअधीक्षक! बदापूरच्या तरुणाच्या यशाचं कौतुक
करमाड) : बदापुर (ता. अंबड जि. जालना) या छोट्याशा गावातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून अगोदर पोलिस उपनिरीक्षक,जिल्हा उपनिबंधक नंतर नायब तहसीलदार आणि आता थेट पोलिस उपअधीक्षक पद मिळविले आहे. शिवप्रसाद नानासाहेब पारवे (30) असे त्या तरुण अधिकाऱ्याचे नाव आहे.
बदापूर येथील रहिवासी नानासाहेब पारवे हे अल्पशिक्षित असून, त्यांचा गावात शेतीसोबतच एक छोटासा व्यवसाय आहे. पती, पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार. काही वर्षांपूर्वी ते मुलांच्या शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले. अनेक वर्षे त्यांनी शेती सांभाळून ते कधी बदापुर तर कधी संभाजीनगर असे त्यांनी अप-डाऊन केले.
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी गावात छोटासा व्यवसाय सुरू करून मुलांचे संगोपन केले. हे करीत असताना त्यांचा मोठा मुलगा नवनाथ पारवे हे पोलिस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून शहर पोलिसांत नौकारीला लागले. दरम्यान, शिक्षण सुरू असताना शिवप्रसाद पारवे यांना लहानपणापासूनच पोलिस खात्यात अधिकारी व्हायचे होते.
छत्रपती संभाजीनगर येथून त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर देवगिरी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पोलिस खात्यात वरिष्ठ अधिकारी व्हायचे स्वप्न असल्याने त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन रात्रंदिवस अभ्यास केला. 2015 पासून मेहनत, जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. यात त्यांना यश मिळाले. सुरुवातीला ते पोलिस उपनिरीक्षक झाले.
2016 ते 2019 पर्यंत पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम केले. त्यानंतरही त्यांनी आपले प्रयत्न न थांबविता अभ्यास सुरूच ठेवला. दरम्यान ते पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन जिल्हा उपनिबंधक म्हणून नागपूर येथे रुजू झाले. 2020 मध्ये नायब तहसीलदार म्हणून त्यांची नेमणूक झाली. इथेच न थांबता त्यांनी पोलिस उपअधीक्षक पदाची परीक्षा दिली. त्यातही त्यांना यश मिळाले.
सध्या ते बुलढाणा येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना पोलिस उपअधीक्षक पदाच्या प्रशिक्षणासाठी बोलविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याच्या अनिश्चिततेच्या वातावरणात यश अपयश हे आपल्या मेहनत व चिकाटीवर अवलबून आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वयंशिस्त आणि समर्पणाची भावना मनात ठेवा. मेहनत, चिकाटी असणे आवश्यक आहे. मेहनत व जिद्दीच्या बळावर काहीही होऊ शकते, असे शिवप्रसाद पारवे यानी सांगितले.
- शिवप्रसाद पारवे