घुंगराळा यात्रेचे असे आहे महत्त्व

प्रदीप पाटील
रविवार, 1 डिसेंबर 2019

यात्रेेचे ठळ्ळक वैशिष्ट्ये

०- प्रतिमाळेगाव म्हणून ओळख 
०- कृषी व पशू प्रदर्शनाची रेलचेल
०- सोमवारी खंडोबाच्या पालखीचे आगमन
०- मंगळवारी जंगी कुस्त्यांची दंगल
०- बुधवारी पशू व कृषी प्रदर्शन व सांस्कृतिक कलामहोत्सव

नायगाव : प्रति माळेगाव म्हणून ओळख असलेल्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील प्रसिद्ध खंडोबाची यात्रा सोमवारी (ता. दोन डिसेंबर) सुरू होत आहे. पाचशे वर्षांपेक्षाही जास्त परंपरा लाभलेली येथील यात्रा पौराणिक वाघ्या-मुरळीच्या लोककलेसह आधुनिक कृषी व पशू प्रदर्शनाने मराठवाडा, विदर्भासह बाजूच्या तेलंगणा व कर्नाटक राज्यातील भाविक भक्तांच्या आकर्षणाचे व भक्तिभावाचे श्रद्धास्थान आहे. कुस्त्यांची दंगल म्हणूनही या यात्रेला महत्त्व आहे. 
  
नांदेड- हैदराबाद राज्य महामार्गावरील कृष्णूर औद्योगिक वसाहतीला लागून घुंगराळा गाव असून, येथे पश्चिम डोंगरावर खंडोबाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरात तीन दगडी स्वयंभू शिळा आहेत. या तीन शिळा खंडोबा, म्हाळसा व बानू म्हणून ओळखल्या जातात. येथे महादेवाची कोरलेली स्वयंभू पिंड देखील आहे. 

मंदिराचे मुख्य मानकरी कुलकर्णी- पांडे घराण्यातील 
मंदिर जरी घुंगराळा येथे असले तरी येथील मंदिराचे मुख्य मानकरी (पुजारी) हे कुंटूर येथील कुलकर्णी- पांडे घराण्यातील आहेत. दर चंपाष्ठमीच्या दिवशी खंडोबाची पालखी कुंटूरच्या दत्तात्रय कुलकर्णी यांच्या घरून निघते. चंपाष्ठमीच्या दिवशी सकाळी घुंगराळा येथील प्रतिष्ठित नागरिक, भोई, मांग, वाघे ही गावगाड्यातली मंडळी सकाळी कुंटूर येथे येतात. पालखीत घोंगडी अंथरूण खंडोबाची मूर्ती ठेवली जाते. येथील कुलकर्णींच्या हस्ते विधिवत खंडोबाच्या पितळी मूर्तीचे विधिवत पूजन करून पालखी वाजत-गाजत पायी घुंगराळा येथील कोमटी समाजाचे बालाजी पत्तेवार यांच्या घरी पालखीचे स्वागत होते. त्यानंतर तेथे पालखीचे पूजन करून रात्री पालखी डोंगरावर नेली जाते. तेथे पूजा, अभिषेकसह रात्रभर खंडोबाचा जागर घालण्याची परंपरा आजही कायम सुरु आहे.

नवस फेडण्यासाठीच गर्दी
तीन दिवस गावातील सर्व जातीतील लहान-मोठ्या मानकऱ्यांच्या घरी पालखी जाते. दररोज नवसाचे भंडारे केले जातात. मूर्ती चौथ्या दिवशी पुन्हा वाजतगाजत कुंटूरच्या कुलकर्णी वाड्यात आणली जाते. विधिवत पूजा करून बारा बलुतेदारांना इनाम (बिदागी-बक्षीस) देऊन मूर्तीचे विसर्जन केले जाते. पुढील वर्षाचा उत्सव येईपर्यंत कुलकर्णीच्या वाड्यात मूर्ती ठेवल्या जातात. चार दिवस चालणाऱ्या यात्रा काळात मराठवाडा, विदर्भासह बाजूच्या तेलंगणा व कर्नाटकातूनही भाविक भक्त आपला नवस फेडण्यासाठीच गर्दी करतात.
 
पौराणिकतेला आधुनिकतेची जोड
येथील खंडोबाचे मंदिर खूप पुरातन असल्यामुळे येथे खूप जुन्या काळापासून खंडोबाचा उत्सव चंपाष्ठमीच्या दिवसापासून पुढील चार दिवस साजरा केला जातो. पुरातन काळाला आधुनिकतेची जोड देत येथील नागरिकांनी तमाशाऐवजी कलामहोत्सव सुरू केला. त्याचबरोबर वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक कला प्रकाराला कुस्ती, पशू प्रदर्शन, कृषी प्रदर्शन अशा काही आधुनिक उपक्रमांची जोड दिली आहे. घुंगराळा गावातील सर्व जाती-धर्मांतील नागरिक एकत्र येऊन खंडोबाचा उत्सव दरवर्षी मोठ्या हर्षोल्हासात साजरा करतात, हे याल यात्रेचे वैशिष्ट्य आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Such is the significance of the guerrilla journey