बॅंंकाची सुलतानी वसुली सुरुच; सरकारची संवेदनशिलता संपली- देवेंद्र फडणवीस

राजाभाऊ नगरकर
Wednesday, 21 October 2020

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह भाजपचे नेते व पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी जिंतूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी पाचेगाव सह इतर शिवारातील नुकसानीची पाहणी केली.

जिंतूर (जिल्हा परभणी) : मागील महिण्यात पडलेल्या पावसाने शेतीचे अभुतपूर्व नुकसान झालेले आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरणे गरजेचे आहे. परंतू तसे न होता बॅंकांच्या सुलतांनी वसुलीचा तगादा लावण्यात आला आहे. यावरूनच सरकारची संवेदनशिलता संपली आहे हे सिध्द होते अशी टिका विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.21) जिंतूर तालुक्यात केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह भाजपचे नेते व पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी जिंतूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी पाचेगाव सह इतर शिवारातील नुकसानीची पाहणी केली.

हेही वाचा -  हिंगोली : मदतीसाठी सरकारला भाग पाडू, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस -

काही ठिकाणी बियाणे बोगस निघाल्याने शेतात काहीच उगवले नाही

यावेळी शिवारात जमलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्यांचा श्री. फडणवीस यांच्यासमोर पाढाच वाचला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून देण्यासाठी सरकार भाग पाडले जाईल असा विश्वास दिला. पुढे बोलतांना श्री. फडणवीस म्हणाले, राज्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. मराठवाड्याचा दौरा करत असतांना या भागात अभुतपूर्व नुकसान झाले असल्याचे दृष्टीस पडत आहे. सलग मोठा पाऊस झाल्याने त्याचा विपरित परिणाम मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतात दिसून आला. अनेक शेतातील पिके हातची गेली आहेत. काही ठिकाणी बियाणे बोगस निघाल्याने शेतात काहीच उगवले नाही.

सुलतानी पध्दतीने बॅंकाची वसुली सुरु

सोयाबीन व कापसासह इतर पिकांची देखील अशीच आवस्था दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतू त्यांचे पंचनामे कऱण्याचे काम तातडीने केले जात नाही हे या राज्याचे दुदैव आहे. त्यामुळे पुढील रब्बीची पेरणी करण्यासाठी देखील शेतकऱ्यांकडे पैसा नाही. काही ठिकाणच्या जमीनी खरडून गेल्या आहेत. त्यासाठी माती आणावी लागणार आहे. त्याला ही पैसा लागणार परंतू शेतकऱ्यांचे खिसे रिकामे राहाणार नाहीत याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. अश्या विदारक परिस्थितीमध्येही बॅंकाकडून अनेक शेतकऱ्यांना कर्ज भरण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सुलतानी पध्दतीने बॅंकाची वसुली सुरु आहे. याकडे मात्र राज्य सरकारचे साफ दुर्लक्ष होत आहे. यावरूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकारची संवेदनशिलता संपली असल्याचे ते म्हणाले. तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल असे वाटत होते. परंतू या सरकारने अपेक्षाभंग केला आहे असे ते म्हणाले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sultani recovery of the bank continues; Government's sensitivity is over Devendra Fadnavis parbhani news