"घाटी'च्या सुपरस्पेशालिटी विंगचे आचारसंहितेपूर्वी उरकणार उद्‌घाटन

योगेश पायघन
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

घाटी रुग्णालयात उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी विंगचे मनुष्यबळाच्या पदनिर्मितीशिवायच विधानसभा आचारसंहितेपूर्वी उद्‌घाटन उरकण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. या विंगमध्ये अद्याप अर्धेअधिक यंत्रांचे इन्स्टॉलेशन बाकी आहे. पाणी अन्‌ विजेचा प्रश्‍न कागदोपत्री सुटला तरी प्रत्यक्षात मात्र कोणतीही व्यवस्था अद्याप तरी झाली नाही. त्यामुळे घाईत उद्‌घाटन उरकल्यास मूत्रपिंडविकार इमारतीसारखी ही इमारतही केवळ शोभेचा पांढरा हत्ती ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

औरंगाबाद ः घाटी रुग्णालयात उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी विंगचे मनुष्यबळाच्या पदनिर्मितीशिवायच विधानसभा आचारसंहितेपूर्वी उद्‌घाटन उरकण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. या विंगमध्ये अद्याप अर्धेअधिक यंत्रांचे इन्स्टॉलेशन बाकी आहे. पाणी अन्‌ विजेचा प्रश्‍न कागदोपत्री सुटला तरी प्रत्यक्षात मात्र कोणतीही व्यवस्था अद्याप तरी झाली नाही. त्यामुळे घाईत उद्‌घाटन उरकल्यास मूत्रपिंडविकार इमारतीसारखी ही इमारतही केवळ शोभेचा पांढरा हत्ती ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

नुकतीच केंद्रीय कुटुंबकल्याण व आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्येही तशा सूचना देण्यात आल्या; तसेच ऑगस्टअखेरपर्यंत उद्‌घाटनाची तयारी करण्याचेही सांगण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. पीएमएसएसवाय फेज तीनमधून दीडशे कोटींची आठ सुपरस्पेशालिटी विभाग असलेली 248 खाटांची स्वतंत्र अद्ययावत विंग उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

कंत्राटदाराकडून 90 टक्के काम झाल्याचा दावा करण्यात येत आहे. 58 कोटींपैकी 20 कोटींची यंत्र आतापर्यंत दाखल झालेली आहे; परंतु या विभागासाठी अद्यापही पदनिर्मिती झालेली नाही. घाटी प्रशासनाकडून या पहिल्या टप्प्यात 465 पदांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. तो मंजुरीसाठी शासनाकडे गेल्या दीड वर्षापासून पडून आहे. त्यामुळे उद्‌घाटन झाले तरी पदनिर्मितीशिवाय हा विभाग रुग्णसेवेत दाखल होणे अशक्‍यप्राय आहे; परंतु याचा विचार न करता आचारसंहिता संपताच सीव्हीटीएस विभाग, नवजात शिशू विभाग सुपरस्पेशालिटीच्या नव्या इमारतीत हलवून उद्‌घाटन करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. त्यासाठी तारखांची जुळवाजुळव सुरू असल्याचे सूत्रांकडून कळाले आहे. 

पुनरावृत्तीची होण्याची शक्‍यता 
घाटीत पाच वर्षांपूर्वी मूत्रपिंडविकार व मूत्रपिंडरोपण विभागाची सुसज्ज इमारत उभी राहिली; मात्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अनास्था आणि पाठपुराव्यासाठी कमी पडलेले प्रशासन, यामुळे हा विभाग पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही. तज्ज्ञ डॉक्‍टरांचे मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री न मिळाल्याने या विभागाची टोलजंग इमारत चक्क शवविच्छेदनासाठी वापरली जात आहे. वरच्या मजल्याचा वापर वसतिगृह म्हणून सुरू आहे. पदनिर्मितीअभावी सुपरस्पेशालिटीची अशीच अवस्था होऊ शकते. 

ग्रंथालय, सीटीस्कॅनलाही मुहूर्त 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मध्यवर्ती ग्रंथालय गेल्या दोन वर्षांपासून निधीसाठी रेंगाळले होते. त्यासाठी आवश्‍यक साधनसामग्रीही दाखल झाली. दरम्यान, अधिष्ठांतापासून, डीएमईआर संचालकांनीही पाहणी केली; मात्र मंत्रिमहोदयांची तारीख न मिळाल्याने हे उद्‌घाटन रेंगाळले होते. आता आचारसंहितेपूर्वी हे ग्रंथालय वापरात येईल, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. शिवाय नव्याने दाखल झालेल्या सात कोटींच्या सीटीस्कॅनलाही या ग्रंथालयासोबतच मुहूर्त मिळणार आहे. 

सुपस्पेशालिटी विंग सुरू करण्यासाठी अगोदर पदनिर्मिती गरजेची आहे. त्या विंगचे उद्‌घाटन तयारीच्या सूचना आहेत; मात्र या प्रक्रियेत सर्व वरिष्ठांचा सहभाग आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम सुरू आहे. त्यांनी उद्‌घाटन करण्यास सांगितले तर उद्‌घाटन केले जाईल; मात्र रुग्णसेवेत ही इमारत येऊ शकणार नाही, असे वरिष्ठांना कळविले आहे. 
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: superspeciality wing Inauguration to be held before the Election Code of Conduct