esakal | ‘या’ तालुक्‍यात नऊ हजार ७८१ बालकांचे सर्वेक्षण, का ते वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

tapasani

कळमनुरी तालुक्यातील तीन वर्षांखालील नऊ हजार ७८१ बालकांचे ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या माध्यमातून आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या बालकांना कुठल्याही आजाराची नोंद नसल्याचे तपासणीतून समोर आले आहे.  

‘या’ तालुक्‍यात नऊ हजार ७८१ बालकांचे सर्वेक्षण, का ते वाचा...

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील तीन वर्षांखालील नऊ हजार ७८१ बालकांचे अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या माध्यमातून आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले आहे. या बालकांना कुठल्याही प्रकारचा गंभीर आजार नसल्याची नोंद सर्वेक्षणामध्ये नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे अंगणवाडी कार्यकर्तीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला ‘कोरोना’विषयी माहिती दिली जात आहे.

‘कोरोना’ विषाणुजन्य आजारामुळे वयोवृद्ध आजारी नागरिकांप्रमाणे तीन वर्षांखालील बालकांनाही या आजाराचा संसर्गाचा धोका होऊ शकतो, हे लक्षात घेता शासनाने प्रत्येक कुटुंबातील तीन वर्षांखालील बालकांची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली होती. 

२५० अंगणवाडी सेविकांची मदत
प्रत्येक गावात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना जबाबदारी नेमून देण्यात आली होती. त्यानुषंगाने एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या २५० अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबात असलेल्या तीन वर्षांखालील बालकांची आरोग्य तपासणी सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली होती. यामधून कळमनुरी विभागांतर्गत १०६ अंगणवाडी कार्यकर्तींच्या माध्यमातून बालकांची आरोग्य तपासणी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ३९१० बालकांची आरोग्य तपासणी सर्वेक्षण करण्यात आले.

हेही वाचा - कोरोना’ जनजागृतीसाठी अंगणवाडी सेविकांना ‘झूम’ ॲपद्वारे प्रशिक्षण, कुठे ते वाचा...

उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाठविले 
बालकाला सर्दी ताप किंवा इतर आजारांची लक्षणे आहेत काय, याच्या नोंदी घेण्यात आल्या. आखाडा बाळापूर विभागांतर्गत १४४ अंगणवाडी कार्यकर्तीच्या माध्यमातून विभागांतर्गत प्रत्येक गावात व कुटुंबाला भेटी देत तीन वर्षांखालील पाच हजार ८४७ बालकांची आरोग्यविषयक माहिती नोंदविण्यात आली. (ता. १५) एप्रिलपासून अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी तीन वर्षांखालील बालकांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण पूर्ण करून नोंदी घेतल्या. यानंतर यामध्ये पंधरा ते वीस बालकांना केवळ सर्दी, ताप ही लक्षणे आढळून आली. या बालकांवर उपचार करण्यासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाठविण्यात आले.

हेही वाचा - गड ते पायथ्यावरील झाडे जगवण्यासाठीची वृक्षप्रेमींची धडपड, कशी आणि कुठे ते वाचा... 

घ्यावयाच्या खबरदारीची दिली माहिती  
सर्वेक्षणाची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या माध्यमातून बालकांची पुनर्तपासणी व सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला बालकांच्या आरोग्यविषयक माहितीप्रमाणेच कोरोना विषाणुजन्य संसर्ग आजाराची माहिती व घ्यावयाची खबरदारी याबाबतही अंगणवाडी सेविका व मदतनीसांमार्फत माहिती दिली जात आहे.


मुंबई येथील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन 
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना घरबसल्या मोबाइलवरच झूम ॲपच्या माध्यमातून कोरोना आजार, घ्यावयाची काळजी, उपाययोजना व बालकांचे करण्यात येत असलेले सर्वेक्षण या संदर्भात मुंबई येथील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली माहिती देण्यात आली आहे. 
- राजकुमार धापसे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी.