निलंबित अभियंता चौथ्या दिवशी पुन्हा रुजू 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

बीड जिल्ह्यातील महावितरणच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर सहायक अभियंत्याने अधिकाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरून शिवीगाळ केली होती. यानंतर अभियंत्याला निलंबित करण्यात आले; परंतु चौथ्या दिवशी निलंबन मागे घेऊन पुन्हा कामावर घेण्यात आले.

बीड - व्हॉट्‌सऍप ग्रुपवर असंवैधानिक भाषा आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्यानंतर निलंबित झालेल्या महावितरणच्या सहायक अभियंत्याला शुक्रवारी (ता. 30) पुन्हा रुजू करून घेण्यात आले आहे. 

कामांतील अडचणी, निरोपांची देवाण-घेवाण आणि अडचणींचे निवारण करण्यासाठी Meter Deletion Urgent नावाचा व्हॉट्‌सऍप ग्रुपवर तयार करण्यात आला होता. महावितरणच्या बीड ग्रामीण उपविभागात नेकनूर शाखेत कार्यरत सहायक अभियंता संतराम यशवंत गित्ते यांनी महावितरणसंदर्भात व्हाट्‌सऍप ग्रुपवर माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकाऱ्यांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरून शिवीगाळही केली होती. यानंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी संतराम गित्ते यांच्यावर मंगळवारी (ता. 27) निलंबनाची कारवाई केली होती.

समाजमाध्यमांवरील असंवैधानिक भाषेच्या वापरावरून शासकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची झालेली ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई ठरली; परंतु चौथ्याच दिवशी कारवाई मागे घेण्यात आली. शुक्रवारी त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The suspended engineer reopens on the fourth day