esakal | आता तरी सुधारणा होणार का?

बोलून बातमी शोधा

आता तरी सुधारणा होणार का?}
आता तरी सुधारणा होणार का?
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता. १२) केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने स्थगिती दिली. महापौरांसह पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी दिल्लीत सचिव मिश्रा यांची भेट घेऊन अपील दाखल केल्यानंतर महापालिकेला दिलासा मिळाला. दरम्यान, आतातरी परिस्थिती सुधारणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

महापालिकेचे सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय मराठवाड्यातील एकमेव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. मात्र, प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी-सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने ठेवलेले पिंजरे यामुळे प्राणिसंग्रहालय वादात सापडले होते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने यापूर्वी महापालिकेला नोटिसा बजावल्या होत्या. मात्र प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे प्राधिकरणाने २६ नोव्हेंबरला प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बुधवारी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या शिष्टमंडळाने दिल्लीत जाऊन अपील दाखल केले. शिष्टमंडळात महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे सभागृहनेते विकास जैन, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, विरोधी पक्षनेते जमीर कादरी; तसेच उपायुक्त वसंत निकम आणि प्राणी संग्रहालय संचालक विजय पाटील यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने मिश्रा यांच्याबरोबरच वन व पर्यावरण सचिव ए. के. नाईक यांचीही भेट घेऊन निवेदन सादर केले. प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास मिश्रा यांनी तातडीने स्थगिती दिली असून, त्याबाबतचे पत्र आठवडाभरात महापालिकेला प्राप्त होईल, असे महापौरांनी सांगितले.

सफारी पार्कचे काम पूर्ण करा 
पदाधिकारी व सचिव मिश्रा यांच्यात तासभर चर्चा झाली. मात्र महापालिकेने नियोजित सफारी पार्कचे काम तातडीने पूर्ण करण्याचे; तसेच प्राणिसंग्रहालय संचालकांना इतर विभागाचे पदभार देऊ नका असे आदेश दिले.