परभणीत स्वॅब तपासणारी प्रयोगशाळा बंद; कारण गुलदस्त्यात

गणेश पांडे
रविवार, 31 मे 2020

परभणी जिल्ह्यातील ३०० वर संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत. या प्रयोगशाळेत दररोज किमान तीस स्वँबची तपासणी व अहवाल येणे अपेक्षित आहे. मात्र, सर्व स्वॅब नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठवले जात असल्याचे माहिती आहे. त्यामुळे हा लाखोंचा खर्च कशासाठी व कोणासाठी केला हे मात्र गुलदस्त्यात आहे.

परभणी : कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅबची तपासणी व अहवाल शेकडोने प्रलंबित असताना, येथे लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या प्रयोगशाळेला मात्र गेल्या काही दिवसांपासून टाळे आहे. येथील यंत्रे भाड्याने व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेण्याचा प्रपंच कशासाठी केला, हा मोठा प्रश्न आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या महिन्याभरापूर्वी कोविड - १९ आरटी पीसीआर टेस्टिंग लॅब गत १५-२० दिवसांपूर्वी वाजत गाजत सुरू करण्यात आली. मशीन भाड्याने घेण्यात आली. अन्य महत्त्वाच्या विभागातून चार तंत्रज्ञ देण्यात आले. एका कंत्राटी अधिकाऱ्याची नियुक्तीदेखील करण्यात आली. जेणेकरून किमान स्वॅबच्या येथे तपासण्या होतील, तत्काळ अहवाल मिळतील असे अपेक्षित होते. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून नांदेड येथील प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रयोगशाळेत नेमके होते काय व तेथील नियुक्त अधिकारी कर्मचारी करतात काय, हा मोठा प्रश्न आहे. तर गेल्या काही दिवसांपासून या प्रयोगशाळेला टाळेच असल्याचे दिसून येते.

हेही वाचा : Parbhani Breaking : सकाळी एकाच्या मृत्यूचा धक्का तर, रात्री सहा पॉझिटिव्ह
 

अहवाल प्रलंबित
जिल्ह्यातील ३०० वर संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत. या प्रयोगशाळेत दररोज किमान तीस स्वँबची तपासणी व अहवाल येणे अपेक्षित आहे. मात्र, सर्व स्वॅब नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठवले जात असल्याचे माहिती आहे. त्यामुळे हा लाखोंचा खर्च कशासाठी व कोणासाठी केला हे मात्र गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा : पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू

चार कर्मचारी चार गावचे
या प्रयोगशाळेसाठी चार तंत्रज्ञांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एक कर्मचारी सोडला तर बाकीच्या तीनही कर्मचारी परगाव, परजिल्ह्यांतून अप-डाऊन करीत असल्याची माहिती आहे. त्यातही जे कर्मचारी बाहेर असतात ते अनेक दिवस प्रयोगशाळेकडे फिरकत नसल्याचे तसेच प्रशिक्षणातही सहभागी झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. त्या ऐवजी अदलाबदलीने येथे ड्युटी केल्या जातात, असा गंभीर प्रकार समोर येऊ लागला आहे. वास्तविक पाहता कोरोना सेंटरमध्ये काम करणाऱ्यांना त्याची बाधा होऊ नये म्हणून केवळ सहा तासांची ड्युटी देण्यात येते. परंतु, एकच कर्मचारी २४-२४ तास येथे ड्युटी करून अन्य कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देत असल्याचेही दिसून येते. त्यामुळे नेहमी चौघांचा भार एक किंवा दोन कर्मचारी उचलतात, त्यामुळे सर्वचजण आळीपाळीने दहा-दहा दिवस गायब असतात व हे सर्व अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याशिवाय शक्य नाही.

सखोल चौकशीची गरज
या प्रयोगशाळेत आतापर्यंत किती अहवाल तपासले गेले व त्याचे काय अहवाल आले याची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. नांदेड येथील प्रयोगशाळेतून आणलेच काही अहवाल येथे तपासल्याचे दाखवले जातात का, याचीदेखील चौकशी होणे गरजेचे झाले आहे. तर जिल्ह्यातून येजा करणाऱ्यावरदेखील नियंत्रण आवश्यक आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swab testing laboratory closed in Parbhani Parbhani News