esakal | पूर्णेतील गाठ्यांचा गोडवा परराज्यापर्यंत; पासष्ट वर्षांपासून मुस्लिम कुटुंब रमलय गाठ्या बनवण्यात
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

एक क्विंटल साखरेपासून नव्वद किलो गाठ्या तयार होतात. त्याच बरोबर लग्नात लागणारा साखरेचा रुखवत, बत्तासे, खडकी, साखरेची लेखन, रेवडी, साखरेच्या लाह्या, चिक्की आदी प्रसादाचे पदार्थही हा परिवार तयार करतो.

पूर्णेतील गाठ्यांचा गोडवा परराज्यापर्यंत; पासष्ट वर्षांपासून मुस्लिम कुटुंब रमलय गाठ्या बनवण्यात

sakal_logo
By
जगदीश जोगदंड

पूर्णा (जिल्हा परभणी) : होळी व गुढीपाडवा या हिंदू सणांचा गोडवा वाढविण्यासाठी साखरेच्या गाठ्या देण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. हिंदूंच्या सणाचा गोडवा वाढविण्याचे काम येथील महबूब शेख हिराजी यांचे अख्खे कुटुंब रात्रंदिवस साखरेच्या गाठ्या बनविण्यासाठी पासष्ट वर्षापासून राबत आहे. मेहबूब यांच्या गाठ्याना सर्वत्र मोठी मागणी असते. त्या कामात त्यांच्या पत्नी शरिफाबी, शेख सादिक व शेख खालेक सुना शमिमबेगम व अमिनाबेगम तसेच नातवंडे सुद्धा मदत करतात.

एक क्विंटल साखरेपासून नव्वद किलो गाठ्या तयार होतात. त्याच बरोबर लग्नात लागणारा साखरेचा रुखवत, बत्तासे, खडकी, साखरेची लेखन, रेवडी, साखरेच्या लाह्या, चिक्की आदी प्रसादाचे पदार्थही हा परिवार तयार करतो. महेबूब यांच्या गाठ्यांमुळे पूर्णा शहराचे नाव दिल्लीपर्यंत पोहचले आहे. त्यांच्या गाठ्यांना चांगलीच मागणी होत आहे. मराठवाड्यासह, पुणे, मुंबई, इंदोर, हैद्राबाद, निझामाबाद, दिल्लीच्या बाजारपेठेत व परराज्यातही अधिक मागणी आहे.

होळी ते गुढीपाडव्या दरम्यान एकमेकांच्या घरातील लहानांना गाठी भेट देवून गळ्यात घालण्याची प्रथा व परंपरा हिंदू धर्मात आहे. होळीमाता व गुढी यांना गाठी अर्पण करतात. या कालावधीत घरोघर साखरेच्या गाठ्या  दिसून येतात. उन्हाळ्यात ऊन लागल्यावर गाठी पाण्यात टाकुन ते पाणी रुग्णास पाजल्यास होणारा त्रास  कमी होतो. म्हणून या गाठ्या उन्हाळाभर घरोघरी जपून ठेवतात. आज बाजारपेठेत खारिक खोबऱ्याच्याही गाठ्या उपलब्ध असतात पण साखरेच्या गाठीला मांगल्याचे व पारंपारिक महत्व असते. 

सणाची गोडी वाढवतो हाच आमचा नफा

हिंदू बांधवांच्या सणाच्या आनंदात आमचा परिवार या माध्यमातून सहभागी होतो. याचा मनातून आनंद होतो. आम्ही सणाची गोडी वाढवतो हाच आमचा नफा आहे. आम्ही दररोज सरासरी दोन तीन क्विंटल गाठ्या बनवतो. आम्ही कुटुंबातील सर्व लहानमोठे मिळून काम करतो. तयार मालाची ठोक व किरकोळ विक्री करतो. आमच्या गाठ्या मुंबई, पुणे, दिल्ली, मराठवाड्यात सर्वत्र जातात असे शेख सादीक शेख मेहबूब यांनी अभिमानाने सांगितले. आम्ही तयार केलेला प्रसाद परमेश्वराच्या चरणाशी जातो व भाविक भक्तीभावाने तो खातात हे पाहून मोठा आनंद होतो. इतके समाधान जगात कशातच नाही. ते पाहून आमचा थकवा दूर होतो असे सादीकभाई सकाळ शी बोलताना म्हणाले.

संपादन- प्रल्हाद कांबळे