कारमध्ये गाणी लावून भिरकावल्या तलवारी

सुषेन जाधव
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

रस्त्याच्या कडेला कार लावून मोठ्या आवाजात गाणे वाजवत चार तरुण तलवारी हवेत भिरकावित होते. आरोपींनी पोलिसांना पाहताच कार सोडून पळ काढला.

औरंगाबाद : कार रस्त्याच्या कडेला लावून त्यात मोठ्या आवाजात गाणे वाजवत तलवारी भिरकावणे दोघा तरुणांना चांगलेच भोवले. त्यांना मंगळवारी (ता.20) सकाळी पोलिसांनी अटक केली. मोहम्मद नफीस ऊर्फ सरवर मोहम्मद याकुब (24, रा. मुजीब कॉलनी) व सय्यद वाजेद (27, रा. किराडपूरा) अशी आरोपींची नावे आहेत. 

एमआयडीसी सिडकोचे पोलिस नाईक गणपतसिंग बायस व त्यांचे सहकारी 16 ऑगस्टरोजी रात्री गस्त घालत असतांना अजिज कॉलनी परिसरात काही तरुण तलवारी घेवून गोंधळ घालत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानूसार नारेगाव अजीज कॉलनी येथे गेले असता तेथे रस्त्याच्या कडेला कार (क्रं. एमएच-20, एएस-7044) लावून मोठ्या आवाजात गाणे वाजवत चार तरुण तलवारी हवेत भिरकावित होते. आरोपींनी पोलिसांना पाहताच कार सोडून पळ काढला. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस कोठडीत रवानगी 

दोघा आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता बुधवारपर्यंत (ता.21) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमणे यांनी दिले. सहाय्यक सरकारी वकील एन.ए. ताडेवार यांनी आरोपींच्या ताब्यातून तलवारी जप्त करणे असून कार मालव-चालकाचा शोध घ्यायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swords thrown into the car : Two youths arrested: Police sent to jail