
२५ हजाराची लाच स्वीकारताना तलाठ्यासह कोतवालास रंगेहात पकडले
लोहारा : शेतीचा फेर फार वरिष्ठांकडून मंजूर करण्यासाठी २५ हजाराची लाच स्वीकारताना तालुक्यातील अचलेर येथील तलाठ्यासह कोतवालाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता.२३) रंगेहात पकडले असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. लाच स्वीकारण्याची दोन महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोहारा तालुक्यातील अचलेर येथील तक्रारदार यांच्या वडीलांनी २००५ मध्ये शेत जमीन घेतली आहे. त्या शेत जमीनीचा फेर फार करण्यासाठी अचलेर सजाचे तलाठी युवराज नामदेव पवार (वय ३६) यांच्याकडे काही दिवसापासून हेलपाटे मारत होते.
तलाठी पवार यांनी तक्रारदार यांना वरिष्ठांकडून फेर फार करून देऊन ऑनलाइन नमुना नंबर नऊची नोटीस काढण्यासाठी ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती २५ हजार रूपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदाराने उस्मानाबाद येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. यावेळी लाच लुचपत विभागाने सापळा लावला. तालुक्यातील जेवळी येथे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पान टपरीवर ३० हजार रूपयांची रोख रक्कम स्वीकारताना तलाठी पवार, कोतवाल प्रभाकर रुपनर (वय ३७) या दोघांना रंगेहात पकडले. यापूर्वी या कामासाठी तक्रारदाराकडून नगदी दहा हजार रूपये घेतल्याचे तलाठी यांनी मान्य केले.
लाच लुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक हुलगे, पोलिस अधिकारी इफ्तेकर शेख, शिध्देश्वर तावसकर, विष्णू बेळे, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांच्या पथकाने कारवाई केली. दरम्यान, मागील दोन महिन्यापूर्वी शहरातील वीज वितरण कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास लाच घेताना रंगेहात पकडले होते. ही घटना ताजी असतानाच अचलेर येथील तलाठी व त्याचा साथीदार असलेला कोतवाल लाचेच्या जाळ्यात अडकला. दोन महिन्यात दोन घटना घडल्या आहेत. लाचेच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे
Web Title: Talathi And Kotwal Found Accepting Bribe Of Rs Twenty Five Thousand Osmanabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..