तलाठी दुसऱ्यांदा अडकला एसीबीच्या जाळ्यात, कुठे? ते वाचाच

राजेश दारव्हेकर
Friday, 29 May 2020

लोकसेवक श्री. गवई यास संशय आल्याने पाच हजाराची लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. परंतु, पडताळणी अंती तलाठ्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर लाचेची मागणी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हिंगोली : कोरोनासोबतच जिल्ह्यात लाचेचे प्रकारही वाढतच चालले आहे. गुरुवारी (ता.२८) लाचलूचपत पथकाने सापळा रचून तलाठ्यावर गुन्हा दाखल केला. चार दिवसांतील लाचखोरीची ही दुसरी घटना आहे.

केसापुर शेत शिवारातील गट क्रमांक २९१, २९२, ३०२ व ३०७ मधील शेताचा त्यांच्या आईच्या व बहिणीच्या हक्कसोड पत्रा प्रमाणे जमिनीचा पेर त्यांच्या भावाच्या नावाने करायचा आहे. तसा सातबारा तयार करून देण्यासाठी घोटा सज्जाचे तलाठी यांनी सात हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. मात्र तलाठ्याला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. त्यावरून लाचलुचपत पथकाने गुरुवारी सापळा रचून तलाठ्यावर गुन्हा दाखल केला आहे. चार दिवसातील ही लाचखोरीची दुसरी घटना आहे.

हेही वाचा - हिंगोलीत पाच रुग्णांनी हरविले कोरोनाला
 

जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या वतीने जनजागृती करून देखील लाच खोरीचे प्रमाण कमी झालेले नाही. दिवसेंदिवस त्यात वाढ होताना दिसत आहे.  कितीही कारवाई केली तरी अधिकाऱ्यांचे लाच घेणे काही थांबत नाही. सध्या लाचेच्या बाबतीत बघायला गेले तर महसूल विभाग अव्वल असून त्या खालोखाल पोलीस विभाग, त्यानंतर पंचायत विभागाकडे पाहिले जाते.

हिंगोली तालुक्यातील केसापुर शेत शिवारातील गट क्रमांक २९१, २९२, ३०२, ३०७ मधील शेताचा त्याच्या आई व बहिणीचे हक्कसोड पत्रा प्रमाणे जमिनीचा फेर त्याच्या भावाच्या नावाने करायचा होता. त्यामुळे तसा सातबारा तयार करून देण्यासाठी घोटा सज्जाचे तलाठी श्री. गवई यांनी तक्रादाराकडे सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्याने थेट लाचलुचपत कार्यालय गाठून तलाठी यांच्या विरुध्दतक्रार दाखल केली. 

हे देखील वाचलेच पाहिजे - लॉकडाउनमध्येही भाजीपाला विक्रीतून मिळविला थेट नफा
 

त्‍यानंतर या तक्रारीची पडताळणी करण्यात आली होती. यावेळी बहिणीचे हक्कसोड पत्राप्रमाणे भावाच्या नावाने सातबारा तयार करून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती पाच हजार रुपये स्वीकारण्यास तलाठी गवई याने समंती दिल्याची बाब समोर आली. 

असा केला गुन्हा दाखल

त्यानुसार लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, पोलिस निरीक्षक ममता अफुणे व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरूवारी केसापुर शेतशिवारात सापळा रचला होता. मात्र लोकसेवक श्री. गवई यास संशय आल्याने पाच हजाराची लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. परंतु, पडताळणी अंती तलाठ्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर लाचेची मागणी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी श्री. गवई यांच्या विरुद्ध (२०१२ मध्ये) लाच स्वीकारल्या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पुन्हा हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talathi Was Caught For The Second Time By The ACB Hingoli News