Navdurga : मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घेणारी शिक्षिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalna

Navdurga : मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घेणारी शिक्षिका

जालना : शाळेची पारंपारिक चौकट न स्वीकारता मुलींच्या मनात जिद्द अन् आत्मविश्वास निर्माण व्हावा, असा ध्यास घेत शैक्षणिक पालकत्व स्वीकारत उपक्रमशीलता जोपासणाऱ्या शिक्षिका म्हणजे अख्तरजहाँ कुरेशी आहेत.

शहरातील नगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका असलेल्या अख्तरजहाँ कुरेशी या मुलींसाठी आधार बनलेल्या आहेत. गेल्या सत्तावीस वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करीत आहे. केवळ शिक्षिका म्हणून नव्हे तर आपण समाजाचे देणे लागतो, या प्रांजळ भूमिकेतून अविरत कार्य करीत आहेत. शाळेव्यतिरिक्त भारत स्काऊट गाईड संस्था, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह विविध संस्थाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतात.

साने गुरुजींचा ‘खरा तो एकची धर्म’ हा उदात्त विचार रुजविण्यासाठी सातत्याने ‘सच्चा है जो मजहब’ उर्दू भाषेत विद्यार्थ्यांना शिकवितात. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ कथांचे उर्दूत भाषांतर शिक्षिका कुरेशी यांनी केले आहे. सध्या शाळेतील जवळपास ९० मुलींचे शैक्षणिक पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे.

डीएड पदवी घेतलेल्या कुरेशी यांनी मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम अंतर्गत बीए, एम ए पदवी प्राप्त केली. एमएससीआयटी जेव्हा २००४ मध्ये नव्याने सुरु झाली तेव्हा राज्यातून गुणवत्तायादीत येण्याचा मान शिक्षिका कुरेशी यांनी मिळविला. शिक्षक प्रशिक्षण, जनगणना, निवडणुकीचे बीएलओची कामात व्यस्त असतात. स्काऊट गाईड जिल्हा संस्थेत पंधरा वर्षांपासून विविध पदावर कार्याची छाप उमटवीत आहेत. राज्यातील एनसीईआरटी मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘टॅग’ उपक्रमात इंग्रजी विषय तज्ज्ञ म्हणून शिक्षिका कुरेशी काम पाहतात.