परभणीत अहवालच मिळत नसल्यामुळे शिक्षकांची धाकधुक 

सकाळ वृतसेवा 
Tuesday, 24 November 2020

शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना आरटीपीआर टेस्ट अनिवार्य केल्यानंतर परभणी जिल्हाभरातील शिक्षक कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या विविध केद्रांवर अक्षरशः रांगा लावून स्वॅब दिले. परंतू, त्याचे अहवालच मिळत नसल्याने शिक्षक-कर्मचाऱ्यांची धाकधुक वाढली आहे.

परभणीः शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना आरटीपीआर टेस्ट अनिवार्य केल्यानंतर जिल्हाभरातील शिक्षक कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या विविध केद्रांवर अक्षरशः रांगा लावून स्वॅब दिले. परंतू, त्याचे अहवालच मिळत नसल्याने शिक्षक-कर्मचाऱ्यांची धाकधुक वाढली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना कक्षाला ते खेट्या मारीत आहेत. 

शिक्षकांना आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केल्यानंतर जिल्हा शिक्षण विभागाने (ता.१७ ते २२) दरम्यान चाचणीच्या सूचना दिल्या होत्या. ता.१७ पासून शिक्षक-कर्मचारी आरोग्य विभागाच्या विविध केंद्रावर जाऊन आपला स्वॅब देत आहेत. सुरुवातीला शिक्षकांना पालिकेच्या आरोग्य विभागातून रिपोर्ट मिळेल असे सांगितले गेले. परंतू, तेथे रिपोर्ट नव्हे तर एकत्रिक सर्व शिक्षकांच्या टेस्टची यादी आलेली होती.

अनेकांना मनस्ताप 
प्रत्येकाचा स्वतंत्र रिपोर्ट जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिला जाणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर व ता. २३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरु होणार असल्याने अनेक शिक्षक कोरोना कक्षात जाऊन रिपोर्टची मागणी करीत होते. तेथून ता. १७ व १८ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या स्वॅबचे रिपोर्ट ता. २० नोव्हेंबर पर्यंत देण्यात आले. ता.१९ नोव्हेंबरपासून घेतल्या स्वॅबचे रिपोर्ट अद्यापही अनेकांना मिळालेले नाहीत, म्हणून शिक्षकांची धाकधुक वाढली आहे. परंतू, तेथे रिपोर्टसाठी अर्ज घेणे व रिपोर्ट देखील देणे बंद केल्यामुळे शिक्षक पुन्हा पुन्हा तेथे खेटे मारीत असून तेथेही त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. 

हेही वाचा - परभणीच्या शाळा, महाविद्यालयात यंत्रणा लागली तयारीला 

शिक्षकांना रिपोर्टसाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही
शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या टेस्टचे अहवाल दिले जाणार नाहीत. हे अहवाल शिक्षण विभागाला पाठवले जाणार असून तेथून ते शाळेला पाठवले जातील. एखादा कर्मचारी त्यांना बाधित आढळला तर आरोग्य यंत्रणा त्यांच्याशी संपर्क साधून पुढील कारवाई करणार आहे. त्यामुळे आता शिक्षकांना रिपोर्टसाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. 
- डॉ. कल्पना सावंत, आरोग्य अधिकारी, मनपा, परभणी. 

हेही वाचा - हिंगोलीत भाजपच्या वतीने वीज बिलाची होळी, राज्य सरकारच्या विरोधात घोषणा

जिल्हा शल्यचिकीत्सक, आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलणार 
जिल्ह्यातील केंद्रावर रांगा लावून शिक्षक-कर्मचाऱ्यांनी स्वॅब दिले. त्याचे अहवाल शिक्षण विभागाला देण्याचे सुचविले होते. तालुका आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला येणे अपेक्षित आहे. परंतू, अद्याप असे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. रिपोर्टसाठी शिक्षकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन आपण जिल्हा शल्यचिकीत्सक, पालिकेच्या आरोग्य अधिकारी यांच्याशी बोलणार आहोत. 
- डॉ. वंदना वाहुळ, शिक्षणाधिकारी (मा.) जि.प. शिक्षण विभाग, परभणी.

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers are worried as they are not getting any report in Parbhani, Parbhani News