esakal | बेवारस कुत्रीच्या उपचारासाठी शिक्षकांचा पुढाकाराने रूग्णवाहिका आली धावून
sakal

बोलून बातमी शोधा

Murud News

मुरूड येथील जनता विद्यामंदिर शाळा परिसरात गेल्या काही वर्षांपासून एक बेवारस कुत्रीचा वावर आहे. शाळेत ती बिनधास्त फिरते. इतर कोणत्याही कुत्र्यांना परिसरात येऊ देत नाही. विद्यार्थी व शिक्षकांना त्रास देत नाही. यामुळेच तिचा विद्यार्थी व शिक्षकांना लळा लागला असून सर्वांनी तिचे लक्ष्मी अन् लाडाचे नाव लक्षी असे नामकरण केले आहे. दोन दिवसांपू्र्वी अचानक आजारी पडलेल्या या लक्षीवर रूग्णवाहिकेतून लातूरला नेऊन उपचार करण्यात आले.

बेवारस कुत्रीच्या उपचारासाठी शिक्षकांचा पुढाकाराने रूग्णवाहिका आली धावून

sakal_logo
By
विकास गाढवे

मुरूड (जि. लातूर) : येथील जनता विद्यामंदिर शाळा परिसरात गेल्या काही वर्षांपासून एक बेवारस कुत्रीचा वावर आहे. शाळेत ती बिनधास्त फिरते. इतर कोणत्याही कुत्र्यांना परिसरात येऊ देत नाही. विद्यार्थी व शिक्षकांना त्रास देत नाही. यामुळेच तिचा विद्यार्थी व शिक्षकांना लळा लागला असून सर्वांनी तिचे लक्ष्मी अन् लाडाचे नाव लक्षी असे नामकरण केले आहे. दोन दिवसांपू्र्वी अचानक आजारी पडलेल्या या लक्षीवर रूग्णवाहिकेतून लातूरला नेऊन उपचार करण्यात आले. शाळेतील शिक्षकांनी त्यासाठी घेतलेला पुढाकार विद्यार्थ्यांना भुतदयेची प्रचिती आणून देणारा ठरला.

हे वाचलंत का- आधी पत्नीचा गळा घोटला, नंतर गर्भवती प्रेयसीलाही संपविले, बीडच्या हैवानाला जन्मठेप..

शाळेत जाडजूड लक्षीचा वावर सर्वांनाच सवयीचा झाला आहे. तिचे तासन् तास लोळण्याचे ठिकाण, विद्यार्थ्यांच्या डब्यातील खाऊ लांब नेऊन खाण्याची तिची पद्धत आदीची सर्वांनाच सवय झाली आहे. बेवारस असली तरी ती शाळेची वारस असल्यागत दिवसभर दिमाखात फिरते. शाळेच्या परिसरात कुत्रे, डुकरे व अन्य प्राण्यांना येऊ देत नाही. दोन दिवसांपूर्वी तिने दोन पिलांना जन्म दिला. ही पिले लगेच मृत झाली. मात्र, वेळपूर्वी प्रसूती झाल्याने दोन पिले पोटातच राहिली. यामुळे ती अस्वस्थ झाली व जागीच निपचित पडली. शिक्षक व्ही. व्ही. फेरे वव ए. एस. पाटील यांनी तिची अवस्था पाहून येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांना पाचारण केले. डॉक्टरांनी तपासून तिला इंजेक्शन दिले व पुढील उपचारासाठी लातूरला नेण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा-  गीतांजलीच्या चारित्र्यावर शरदला संशय होता, मग कपाशीच्या पऱ्हाट्यावरच...

वेळेत उपचार न झाल्यास लक्षीच्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर शिक्षकांनी क्षेत्र विकास समितीचे सचिव प्रवीण पाटील यांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी लागलीच समितीची रूग्णवाहिका लक्षीसाठी उपलब्ध करून दिली. शाळेतील सेवक श्रीराम वैद्य यांनी रूग्णवाहिकेचे चालक म्हणून जबाबदारी पार पाडली. शिक्षक यु. एस. मिसाळ यांनी लक्षीची सोबत केली. लातूरच्या पशुवैद्यकिय दवाखान्यातील डॉक्टरांनी लक्षीवर तातडीने सिझर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर अर्धा तासात लक्षीच्या प्रकृतीत सुधारणा झाली. सध्या लक्षीची प्रकृती चांगली असून तिच्यावरील उपचाराची माहिती शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना समजताच तिला पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली.

सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर लक्षीने दोन पिलांना जन्म दिला असून तिला महात्मा गांधी वसतिगृहातील एका खोलीत ठेवण्यात आले आहे. लक्षी व तिचे पिले सुखरूप आहेत. लक्षी आमच्या शाळेच्या परिवाराची सदस्य असून सर्वांनाच तिचा लळा लागला आहे. तिच्या उपचारासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला व मलाही योगदान देता आले. मुक्या प्राण्यावर प्रेम करावे, असा संदेश शाळेतील विद्यार्थ्यांना देता आला.
- प्रवीण पाटील, सचिव, क्षेत्र विकास समिती, मुरूड.

क्लिक करा- भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे अडचणीत, असे आहे प्रकरण...