esakal | शिक्षकांचे एका क्लिकवर वेतन खात्यावर जमा, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad Zilla Parishad

एका क्लिकवर शिक्षकांचे पगार सीएमपी प्रणालीद्वारे करणारी मराठवाड्यातील तिसरी उस्मानाबाद जिल्हा परिषद तिसरी ठरली आहे.

शिक्षकांचे एका क्लिकवर वेतन खात्यावर जमा, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा पुढाकार

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्हा परिषद शाळेच्या सर्वच शिक्षकांचा या महिन्यापासून सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट) प्रणालीद्वारे एका क्लिकवर वेतन खात्यावर जमा झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न भेडसावत होता. आता मात्र थेट खात्यावर वेतन जमा होत असल्याने मोठ्या कटकटीतून मुक्तता झाल्याची प्रतिक्रिया शिक्षक वर्गातून येत आहे. ही प्रणाली राबविणारी मराठवाड्यातील तिसरी, तर राज्यातील नववी जिल्हा परिषद आहे.

अधिकारी वर्गाचे जिल्हा परिषद शाळांसाठी आता एक दिवस अभियान

जिल्हा परिषदेतील शिक्षकांसाठी वेतनाची प्रक्रीया फारच किचकट होती. तालुकास्तरावरून वेतनाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवाला जात होता. त्यानंतर पुन्हा त्याच मार्गाने तालुकास्तरावरून संबंधित शिक्षकांच्या खात्यावर वेतनाची रक्कम जमा होत असे. या प्रक्रियेला सातत्याने विलंब लागत होता. शिक्षकांना महिन्याचे वेतन मिळण्यासाठी दुसऱ्या महिन्याची १० ते १५ तारीख उजडत होते. त्यातही सुट्या आल्या तर आणखीन विलंब व्हायचा.

याशिवाय एखादा अधिकारी रजेवर असला तरी सर्वच शिक्षकांना त्याची प्रतिक्षा करावी लागत होती. प्रत्येक महिन्यात शिक्षकांचे डोळे पगारीकडे लागलेले असयाचे. मात्र कुठेतरी तांत्रिक अडचण यायची अन् वेतनाची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर जात होती. त्यातही वेतनासाठी मोठा अर्थपूर्ण व्यवहारही होत असे. अशा सर्वच घटकांना आता ब्रेक लागणार आहे. जिल्ह्यात चार हजार ९८० प्राथमिक, २९३ माध्यमिक आणि ३२ केंद्रप्रमुखांना याचा लाभ होत आहे.

एकोणिस गावांत कोरोनाचा झाला नाही प्रवेश ! एकावन्न लोकांचा मृत्यू

अशी होती प्रक्रिया
जिल्हा परिषदेतील मुख्यलेखा व वित्त अधिकारी बजेट व रेमिटन्सची प्रत गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) पाठवत होते. त्यानंतर बीडीओकडून गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे (बीओ) एका धनादेशाद्वारे सर्व शिक्षकांची रक्कम जात असे. पुढे बीओकडून जिल्ह्यातील एक हजार ८० शाळांच्या मुख्याध्यापकांच्या नावाने चेक काढले जात होते. त्या सर्वच मुख्याध्यापकांना पुन्हा बँकेत जाऊन सर्वच शिक्षकांच्या खात्यावर रक्कम वर्ग करावी लागत होती. ही प्रक्रिया मोठी किचकट असल्याने प्रक्रियेला विलंब लागत होता. आता मात्र एका क्लिकद्वारे थेट संबंधित शिक्षकांच्या खात्यावर वेतनाची रक्कम वर्ग होत आहे.

वेळेचा अपव्यय वाचला आहे. हेलपाटे मारणे टळले आहे. वैद्यकीय बिलेही याचद्वारे मिळणार आहेत. त्यामुळे एजंटांचा सुळसुळाट कमी होणार आहे. एक वर्षभर राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत होतो. आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र जिल्हा परिषदेने लेखी पत्र दिल्याने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. आता प्रत्यक्ष वेतन खात्यावर पडू लागल्याने शिक्षकवर्ग समाधानी आहे.
- कल्याण बेताळे, राज्य उपाध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक समिती.

एक चांगला उपक्रम राबविला आहे. कालपासूनच त्याला सुरवात झाली. शिक्षकांना आता त्यांच्या मूळ शिकविण्याच्या प्रक्रियेवर लक्ष देता येईल. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास यामुळे मदत होईल.
- सुरेश केंद्रे, मुख्यलेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.

उस्मानाबादेत बेकायदेशीर अँटिजेन टेस्ट करणाऱ्या डायग्नोस्टिक केंद्रावर कारवाई

संपादन - गणेश पिटेकर