
निलंगा तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबर 2020 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर या पावसामुळे यामुळे साधारणपणे ८०० हेक्टर जमीन खरडून गेली होती.
निलंगा (लातूर) : तालुक्यात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या नुकसान भरपाईपोटी 40 हजार 813 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 26 कोटी 12 लाख रुपये अनुदान जमा करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार गणेश जाधव यांनी दिली. कांही शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे तर कांहीना अनुदानाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
निलंगा तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबर 2020 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर या पावसामुळे यामुळे साधारणपणे ८०० हेक्टर जमीन खरडून गेली होती. काही घरांची अंशतः पडझड झाली, त्यामुळे शासनाने जिरायत व बागायत पिक नुकसानी करिता दहा हजार रुपये प्रति हेक्टर व बहुवार्षिक फळपिकासाठी २५ हजार प्रति हेक्टरप्रमाणे नुकसान भरपाई जाहीर केली आहे. खरडून गेलेल्या जमिनीसाठी ३७ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अनुदान निश्चित करण्यात आले आहे. तर अंशतः घर पडझडीसाठी सहा हजार रुपये नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली आहे.
त्यानुसार शासनाने 50 टक्के निधी येथील तहसील कार्यालयाच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. तालुक्यातील 30 गावातील 13 हजार 372 शेतकऱ्यांच्या खात्यावर सात कोटी 84 लक्ष रूपये वर्ग करण्यात आले असून अनेक गावातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष हातात पैसे पडणार आहेत. पीक नुकसानीचे 53 गावातील 25 हजार 158 शेतकऱ्यांना 15 कोटी 22 लाख रुपये बँकेत वर्ग करण्यात आले. खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई म्हणून 37 गावातील दोन हजार 201 शेतकऱ्यांना तीन कोटी एक लाख रुपये बँकेत वर्ग करण्यात आले आहेत.
घरांची पडझड झालेल्या 82 कुटुंबांना एक लाख 92 हजार रुपये त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. तालुक्याला आजपर्यंत 26 कोटी 44 लाख रुपये अनुदानापैकी 83 गावातील 40 हजार 813 शेतकऱ्यांना 26 कोटी 12 लाख रुपये बँकेत जमा करण्यात आले आहेत. मात्र महसूल विभागाकडून शासनाकडे 49 कोटीची गरज असल्याचा प्रस्ताव सादर केला असून केवळ 26 कोटी रूपये प्राप्त झाले असल्यामुळे हा निधी काही शेतकऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे तर काही शेतकऱ्यांना निधीची प्रतिक्षा करावी लागणार आहे. जवळपास 12 हजार शेतकऱ्यांना आज रोजी अनुदानाचे पैसे प्रत्यक्षरीत्या काढता येतील तर उर्वरित शेतकऱ्यांना मंगळवारपासून पैसे काढता येतील, अशी माहिती गणेश जाधव, तहसीलदार निलंगा यांनी दिली.
संपादन - सुस्मिता वडतिले