परळीत एसटीचे दहा कर्मचारी निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंकजा मुंडे

परळीत एसटीचे दहा कर्मचारी निलंबित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर येथील आगारातील कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून संपावर आहेत.

या संपामध्ये सहभागी असणाऱ्यांपैकी दहा कर्मचाऱ्यांवर आगार प्रमुखांनी गुरूवारी निलंबनाची कारवाई केली आहे. तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी संपकऱ्यांची भेट घेऊन संपाला पाठिंबा दिला. शासनाने लवकरात लवकर यासंदर्भात निर्णय घ्यावा. जनतेला व कर्मचाऱ्यांना वेठीस धरु नये अशी मागणीदेखील त्यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून येथील एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आगारासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्य शासनाने यावर अद्यापही कुठलाही तोडगा काढला नाही. त्यामुळे हे आंदोलन सुरूच आहे. उलट राज्यभरात कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यामुळे हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचा आरोप परिवहन महामंडळाचे कर्मचारी करीत आहेत. या आंदोलनात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी गुरुवारी (ता.११) सहा वाहक व चार चालकांना निलंबित करण्याचे आदेश आगार प्रमुखांनी काढले आहेत.

या निलंबनाच्या आदेशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून शासनाने कितीही दबाव आणून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची माहिती कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी येथील परिवहन मंडळाच्या कर्मचारी व कुटुंबातील सदस्यांनी आगार ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढला व तहसीलदार सुरेश शेजूळ यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

loading image
go to top