सिध्देश्वरचे सर्व दरवाजे पाच फुटाने उघडले, तर इसापूरचे दोन दरवाजे उघडले

राजेश दारव्हेकर
Tuesday, 15 September 2020

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सोमवारी दहापैकी दोन गेट तीन फुटाने उघडले होते, तर मंगळवारी (ता.१५) सर्व दहा गेट पाच फुटाने उघडून ३६ हजार ४०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. 

हिंगोली : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात पाण्याची आवक वाढल्याने औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर धरणात सोमवारपासून धरणाचे दहा गेट उघडले आहे. ते दहा गेट उघडून पुर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारी दहापैकी दोन गेट तीन फुटाने उघडले होते, तर मंगळवारी (ता.१५) सर्व दहा गेट पाच फुटाने उघडून ३६ हजार ४०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. 

औंढा तालुक्यातील सिध्देश्वर धरणात येलदरीतून पाण्याची आवक सुरू आहे. येलदरी धरण शंभर टक्के भरल्याने सिध्देश्वर धरणात पाणी सोडले जात आहे. सिध्देश्वर धरणदेखील शंभर टक्के भरल्याने यातील पाणी पुर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सिध्देश्वर धरणाचे दहा गेट उघडण्यात आले. ज्यात गेट क्रमांक दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, अकरा व तेरा हे गेट पाच फुटाने उघडले आहेत. यातून ३६ हजार ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हे पाणी पुर्णा नदीच्या पात्रात सोडण्यात येत असल्याने नदी काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. यावर्षी धरणातून आतापर्यंत तीन वेळेस दहा गेट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

इसापूरचे दोन दरवाजे दहा सेंटिमीटरने उघडले... 

कळमनुरी : इसापुर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता मंगळवारी (ता.१५) ला सुरू असलेल्या नऊ दरवाजांपैकी सकाळी आठ वाजल्यापासून धरणाचे सात दरवाजे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत दोन दरवाजे दहा सेंटिमीटरने उघडे असून यामधून पैनगंगा नदीपात्रात १९.५३४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. इसापूरच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस, वरच्या बाजूला असलेल्या बंधाऱ्यामधून केलेल्या पाण्याचा विसर्ग पाहता इसापूरचे सोमवारी नऊ दरवाजे पन्नास सेंटिमीटरने उघडून पैनगंगा नदीपात्रात ३०.७८१८ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 

सद्यस्थितीत ९८.९० टक्के पाणीसाठा उपलब्ध... 

धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहता ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प प्रशासनाने मंगळवारी (ता.१५) सकाळी आठ वाजल्यापासून धरणाच्या सुरू असलेल्या नऊ दरवाजांपैकी सात दरवाजे टप्प्याटप्प्याने बंद केली आहेत. सद्यस्थितीत दोन दरवाजे दहा सेंटिमीटरने उघडी ठेवण्यात आली आहे. यामधून १९.५३४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीपात्रात करण्यात येत आहे. इसापुर धरणामध्ये सद्यस्थितीत ९८.९० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. येणाऱ्या पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी-अधिक करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रकल्प प्रशासनाकडून देण्यात आली.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten gates of Siddheshwar Dam in Aundha Nagnath taluka have been opened since Monday