लातूर जिल्ह्यात ढाब्यावर छापा, दहा लाखांचा देशी-विदेशी दारु जप्त

Chakur Crime News
Chakur Crime News

चाकूर (जि.लातूर) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दारू विक्रीवर बंदी असतानाही खुलेआम दारूची विक्री करणाऱ्या ढाब्यावर चाकूर पोलिसांनी छापा टाकून कार, टेम्पोसह दहा लाख रूपयांचा देशी व विदेशी दारूचा साठा रविवारी (ता.२२) रात्री जप्त केला आहे. करोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व बार, देशी दारूची दुकाने बंद ठेवण्याचा प्रशासानाचा आदेश असतानाही लातूर-नांदेड रस्त्यावरील अलगरवाडीपाटी जवळील एका धाब्यावर अनाधिकृतपणे दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यावरून पोलिस निरीक्षक जयवंतराव चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी तोटेवाड, पोलिस उपनिरीक्षक त्र्यंबक गायकवाड, खंडू दर्शने, रामचंद्र गुंडरे, शाहु बनसोडे, तानाजी आरदवाड, दत्ता थोरमोटे, पाराजी पुट्टेवाड यांनी रविवारी रात्री धाड टाकली. यावेळी कार व टेम्पोमधून दारूची विक्री करीत असल्याचे पोलिसांनी आढळून आले. एक हजार सातशे देशी दारूच्या बाटल्या यासोबतच विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या सापडून आल्या. कार (एमएच २४ एएस ८३८०) व टेम्पो (एमएच २६ बीई ०४६६) असा ९ लाख ७९ हजार रूपयाचा माल जप्त केला आहे. पोलिस उपनिरीक्षक खंडू दर्शने यांच्या फिर्यादीवरून धाबा चालक नामदेव रामचंद्र घुमे व त्याचा मुलगा व्यंकटेश नामदेव घुमे (रा.अलगरवाडी) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुणे, मुंबईच्या प्रवाशांची पोलिसांनाही धास्ती
लातूर ः  पुणे, मुंबईला राहतो म्हटले की त्याकडे आदराने पाहिले जात होते. एखादी व्यक्ती पुणे, मुंबईहून आली म्हटले की त्याची आर्जवे केली जात असे. पण आज पुणे, मुंबईहून आलो म्हटले की त्याला वाळीत टाकण्याचा प्रकार होत आहे. रविवारी जनता संचारबंदी असताना असेच काही प्रवासी आले. त्यांची पोलिसांनीही धास्ती घेतली होती. अशा प्रवाशांना तातडीने तुम्ही रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेण्याचा सल्ला पोलिस अधिकारी देत होते. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्रात मुंबई व पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ही दोन्ही शहरे बंद करण्यात आली आहेत.

त्यामुळे नोकरीच्या निमित्ताने गेलेले अनेक जण आता गावाकडे परतू लागले आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्याने विद्यार्थीही गावाकडे परतू लागले आहेत. गेल्या काही दिवसांत परत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात रविवारीदेखील सकाळी काही जण आले. त्यांनी आपण मुंबई, पुण्याहून आल्याचे सांगताच पोलिस त्यांना तातडीने रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेण्याचा सल्ला देत होते. त्यांच्याजवळ जायलाही कोणी तयार नव्हते. लांबूनच त्यांना बोलण्यात येत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com