गांजा लावणाऱ्या शेतकऱ्याला 10 वर्षांची शिक्षा

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

पोलिसांनी सापळा लावून अशोक गायकवाडच्या शेतात छापा मारला असता, चार ते नऊ फूट उंचीची गांजाची 26 झाडे आढळून आली होती. ज्याचे मूल्य 39 हजार 440 रुपये होते. ही झाडे जप्त करून तपासणीसाठी नमुना पाठवण्यात आला होता व सीए रिपोर्टमध्ये ती झाडे गांजाचीच असल्याचे स्पष्ट झाले होते.

औरंगाबाद : दरेगाव परिसरातील (ता. खुलताबाद) स्वत:च्या शेतामध्ये मक्‍याच्या पिकात 39 हजार 440 रुपये मूल्य असलेल्या गांजाच्या 26 झाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. गिरधारी यांनी गुरुवारी (ता. 29) ठोठावली. अशोक गायकवाड (वय 40, रा. दरेगाव) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

दरेगाव परिसरातील गट क्रमांक 211 मधील शेतात मका पिकात गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती 14 मे 2011 ला खुलताबाद पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सलीम बशीर पठाण, पंच व इतर पोलिस अधिकाऱ्यांनी सापळा रचून घटनास्थळी छापा मारला. यात अशोक गायकवाडच्या शेतात चार ते नऊ फूट उंचीची गांजाची 26 झाडे आढळून आली होती. ज्याचे मूल्य 39 हजार 440 रुपये होते. ही झाडे जप्त करून तपासणीसाठी नमुना पाठवण्यात आला होता व सीए रिपोर्टमध्ये ती झाडे गांजाचीच असल्याचे स्पष्ट झाले होते. 

दहा वर्षे सक्‍तमजुरी
पीएसआय पठाण यांच्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यामध्ये फिर्यादी व पंचाचा जबाब तसेच सीए रिपोर्ट महत्त्वाचा ठरला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने अशोक गायकवाड याला दोषी ठरवून एनडीपीएस कायद्यानुसार दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ten years punishment to farmers for took yield of hemp