बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना, बीड जिल्ह्यातील बर्दापूरात तणावाची स्थिती

प्रशांत बर्दापूरकर
Wednesday, 28 October 2020

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे मंगळवारी (ता.२७) रात्री अज्ञातांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने गावात बुधवारी (ता.२८) सकाळपासूनच तणावाचे वातावरण आहे.

अंबाजोगाई (जि.बीड)  : अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे मंगळवारी (ता.२७) रात्री अज्ञातांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने गावात बुधवारी (ता.२८) सकाळपासूनच तणावाचे वातावरण आहे. गावातील पोलिस ठाण्यासमोरच आंदोलकांनी घटनेस जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत ठिय्या दिला होता. दरम्यान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लातूरचे उपमहापौर बिराजदारांचे स्थायी समिती सदस्यत्व रद्द; सर्वसाधारण सभेचा ठरावही बेकायदा, औरंगाबाद खंडपीठाने केले स्पष्ट

बर्दापूर येथे पोलिस ठाण्याच्या बाजुलाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याची मंगळवारी रात्री कोणीतरी अज्ञातांनी विटंबना केली. बुधवारी सकाळी ही घटना लक्षात आल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळुन घटनेचा निषेध केला. पोलिस ठाण्यासमोरही जमाव जमला. त्यांनी घोषणा देत, घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत, महिलांसह कार्यकर्त्यांनी ठाण्यासमोरच ठिय्या दिला होता. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बीडचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक श्री. लांजेवार व माजलगावचे पोलिस उपअधीक्षक श्री. पाटील हे बर्दापूर येथेच ठाण मांडून होते. गावातील बाजारपेठ बंद होती, परंतू गावात तणावपूर्ण शांतता होती.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tension Over Ambedkar Statue In Bardapur Beed News