बावीस वर्षांनी एकत्र जमले दहावीचे विद्यार्थी

नवनाथ इधाटे
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

मित्रत्वाचे ऋणानुबंध, गुरुजनांप्रती असलेली कृतज्ञता यात सामाजिकतेचे भान जपत दहावीतील वर्गमित्र तब्बल बावीस वर्षांनी एकत्र आले. एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात त्यांनी गप्पाटप्पा करीत, जुन्या आठवणींना उजाळा दिला. किनगाव (ता. फुलंब्री) येथील न्यू हायस्कूल शाळेत वर्ष 1997-1998 मध्ये दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा नुकताच झाला.

फुलंब्री, ता. 19 (जि.औरंगाबाद) : मित्रत्वाचे ऋणानुबंध, गुरुजनांप्रती असलेली कृतज्ञता यात सामाजिकतेचे भान जपत दहावीतील वर्गमित्र तब्बल बावीस वर्षांनी एकत्र आले. एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात त्यांनी गप्पाटप्पा करीत, जुन्या आठवणींना उजाळा दिला. किनगाव (ता. फुलंब्री) येथील न्यू हायस्कूल शाळेत वर्ष 1997-1998 मध्ये दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा नुकताच झाला.

अध्यक्षस्थानी श्री. साळुंके होते. प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांची उपस्थिती होती. प्रमुख मान्यवर म्हणून गुरुजन, तसेच गावातील व पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, पत्रकार, वकील, डॉक्‍टर, अभियंते, प्रगतिशील शेतकरी, विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती यांची विशेष उपस्थिती होती.

वीस वर्षांनंतर शाळेत एकत्र येऊन आठवणींना उजाळा देणाऱ्या सोहळ्यात सर्वजण गहिवरले. गुरुजनांची, मित्रांची, शाळेची आणि गावाच्या भेटीची ओढ सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होती. याप्रसंगी शाळेत राष्ट्रगीत, परिपाठ घेऊन शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते पाच वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षसंवर्धनाचा संदेश व जनजागृतीसाठी गावातून ढोल ताशा, लेझीम, मृदंग व टाळाच्या गजरात सहकुटुंब सहपरिवार वृक्षदिंडी काढण्यात आली. गावातील प्रत्येक घरात रोपाचे वाटप करून संवर्धनासाठी जनजागृती करण्यात आली. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन तसेच मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले. या सोहळ्यात गुरुजनांच्या निष्काम कार्यासाठी त्यांचा यथोचित कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.

आबालवृद्धांच्या सहभागाने कार्यक्रमात रंगत भरली गेली. गप्पागोष्टी, चर्चा, स्नेहभोजनाच्या माध्यमातून सोहळा रंगत गेला. अनेकांच्या मनातील विचारांचे आदान-प्रदान झाले. भूतकाळातील आठवणी आणि गंमतीजमती यांनी वातावरण हलकेफुलके झाले. यातून सर्वांची मने आनंदुन गेली होती.बहीण-भावाच्या नात्याला दृढ करणारा रक्षाबंधनाचा कार्यक्रम भगिनींनी आयोजित करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व मित्रांचा एक ग्रुप फोटो आणि एक रोप भेट स्वरूपात देण्यात आले.
याप्रसंगी बौद्धिक, मजेशीर खेळ घेण्यात आला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनी पुन्हा नव्याने भेटण्याचे आश्वासन देऊन सर्वांचा भावस्पर्शी निरोप घेतला. अनिल सोनवणे यांनी प्रास्ताविक, सचिन सोनवणे आणि मिनीनाथ खलाटे यांनी सूत्रसंचालन केले. स्वागत संचालन कृष्णा चव्हाण, सुविचार उमेश सोनवणे, अमृतवचन आणि गीत शीतल झाल्टे, सुभाषित मिनीनाथ खलाटे यांनी सादर केले. गणेश सोनवणे यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tenth class students get together after 22 years