esakal | संचारबंदी काळात दुय्यम निबंधक कार्यालय सुरूच, कोरोना नियमांचा फज्जा

बोलून बातमी शोधा

deputy registrar office
संचारबंदी काळात दुय्यम निबंधक कार्यालय सुरूच, कोरोना नियमांचा फज्जा
sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (लातूर) : येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नागरिकांनी कामासाठी कार्यालय व परिसरात गर्दी केल्यामुळे कोरोना नियमाचा फज्जा उडाला असून सर्वच शासकीय कार्यालये बंद असताना हे कार्यालय सुरूच कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे. शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या कार्यालय प्रमुखावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून विविध कार्यालयात कामासाठी कर्मचाऱ्यांची उपस्थिती नगण्य आहे. शिवाय तहसील, उपविभागीय अधिकारी, पंचायत समिती, न्यायालय आदी शासकीय कार्यालये कामकाज बंद ठेवले आहेत. केवळ अत्यावश्यक कामे केली जात आहेत. मात्र येथील दुय्यम निबंधक कार्यालय शासनाच्या नियमाला अपवाद ठरत आहे. संचारबंदी व शासकीय कामकाज बंद असतानाही येथील कार्यालयामध्ये व कार्यालयाच्या परिसरात नागरिकांनी आपल्या जमिनीविषयी नोंदी, माहिती व इतर शेतीविषयक कामासाठी कार्यालयात मोठी गर्दी होताना दिसत आहे.

संबंधित अधिकारी यांच्याकडून नियम धाब्यावर बसवून सोशल डिस्टन्स व कोरोना नियमाचा फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे. नागरिक तर सोडाच कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या ही तोंडाला मास्क नव्हते, यामुळे कार्यालयाच्यावतीने सोशल डिस्टन्समध्ये थांबण्यासाठी काही नियम आखले नाही किंवा तेथे कार्यालयासाठी आलेल्या नागरिकांना योग्य अंतरावर थांबवण्यासाठी कोणता गार्ड उपस्थिती नव्हता, अनेक नागरिकांच्या तोंडाला मास्क नव्हते. कोरोना नियम चक्क धाब्यावर बसवले जात आहेत. एकीकडे कोरोनामुळे संपूर्ण राज्यभरात संचारबंदी असताना निलंगा येथे दुय्यम निबंधक कार्यालय शासनाचे व जिल्हाधिकारी याचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

कार्यालयात पुन्हा पुन्हा गर्दी

अत्यावश्यक सेवेसाठीच कार्यालय सुरु ठेवण्याचे शासनाचे आदेश असताना सुद्धा निलंगा येथील दुय्यय निबंध कार्यालयात व परिसरात पुन्हा लोकांची गर्दी होत असल्याने या भागातील जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. या ठिकाणी हॉटेल सुद्धा सुरु असून अनेक लोक गर्दी करत आहेत. कार्यालयाच्या अवतीभवती अनेक घरे आहेत. मात्र जागा खरेदीविक्री करणे हे अत्यावश्यक सुविधामध्ये मोडते का? असा ही प्रश्न येथील नागरिक उपस्थित करत आहेत. जर या परिसरात नागरिकांची गर्दी कमी नाही झाल्यास परिसरातील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, तरी याबाबत वरिष्ठांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.