वाळूज : मंगळसूत्र लांबविले अन्‌ कारमधून पळाला

आर. के. भराड
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

ही घटना शुक्रवारी (ता. 13) दुपारी साडेबाराच्या सुमारास सिडको वाळूजमहानगर येथे घडली. 

वाळूज (जि. औरंगाबाद) - घरासमोर आलेल्या हातगाडीवर भाजीपाला खरेदीसाठी करीत असलेल्या महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे मंगळसूत्र कारमधून आलेल्या एका चोराने लंपास केले. ही घटना शुक्रवारी (ता. 13) दुपारी साडेबाराच्या सुमारास सिडको वाळूजमहानगर येथे घडली. 

राधाबाई नवनाथ बडे (वय 48, रा. सिडको वाळूजमहानगर) या शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरासमोर आलेल्या हातगाडीवरील भाजीपाला खरेदीसाठी गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करताना तेथे लाल टी शर्ट घातलेला एक तरुण आला. त्याने भाजीपाला विक्रेत्याला काय भाव आहे, असे विचारत भाजीपाला निवडण्यात दंग असलेल्या राधाबाई बडे यांच्या गळ्यातील पाच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून पळ काढला. ही घटना घडल्यामुळे श्रीमती बडे व भाजीपाला विक्रेत्या महिलेने चोर-चोर असे म्हणून मदतीसाठी आरडा-ओरडा केला. तोपर्यंत चोराने कारमधून पळ काढला. 
 
चोराची कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 
सिडको वाळूजमहानगर येथे चोर मंगळसूत्र चोरी करून पसार होत असताना त्याची पांढऱ्या रंगाची कार परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या मंगळसूत्र चोरीची माहिती मिळताच मिळतात पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of mangalsutra at waluj