हदगावमध्ये संचारबंदीचे गांभीर्य नाहीच

hadgav.jpg
hadgav.jpg


हदगाव, (जि.नांदेड) ः शहर व तालुक्यात कोरोनाची जणू काही भीतीच नसल्यासारखे नागरिक सर्वत्र वावरत असून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवल्याकारणाने नागरिकांनी गैरफायदा घेतल्यासारखे वातावरण या ठिकाणी बघावयास मिळत आहे. या वेळी आठवडे बाजारच्या दिवशी बाजार भरला जरी नसला तरी बाजार भरल्यासारखीच गर्दी बघावयास मिळाली. किराणा आणि भाजीपाल्याच्या दुकानांवर नागरीक अधिक गर्दी करीत असल्याने संचारबंदीची ‘ऐशी की तैशी’ असेच काहीशे चित्र बघावयास मिळत आहे.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू

शहर व तालुक्यात लॉकडाउनची पुरेपूर अंमलबजावणी होत असल्याचे बघावयास मिळत असून शहरासह तामसा, निवघाबाजार, बामणीफाटा, मनाठा येथील बाजारपेठ पूर्णतः बंद असली तरी नागरिकांच्या सोयीसाठी व त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली असल्याने नागरिक त्या दुकानांवर मोठी गर्दी करीत आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी या ठिकाणी होत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शहरातील आझाद चौक, जुना बसस्थानक आदी भागातील दुकाने काही वेळेकरिता प्रशासनाकडून सुरू ठेवण्यात आले असली तरी नागरिकांनी त्या दुकानांवर एकच गर्दी करू नये, असेही आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.

नियमांची पायमल्ली

भाजीपाला विक्रेते आणि किराणा दुकाने याच ठिकाणी अधिकची गर्दी बघावयास मिळत असून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली नेमकी याच ठिकाणी होत असल्याचे बघावयास मिळत आहे. सोशीअल डिस्टन्सिंग ठेवण्यात यावे, अशा सूचना प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येत असल्या तरी नागरिक याकडे फारशे गांभीर्याने का घेत नाहीत, हे कळण्यास मार्ग नाही. नजीकच्या यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्यात कोरोना संसर्ग विषाणूचा रुग्ण आढळल्याच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियावर झळकताच लोकांमध्ये काही प्रमाणात का होईना जागरूकता येईल, असे वाटत होते. परंतु, नागरिक फारशी काळजी घेत नसल्याचे शहरात जागोजागी होत असलेल्या गर्दीतून दिसून येत आहे. किराणा दुकाने आणि भाजीपाला विक्रेत्यांच्या दुकानांवर अशीच गर्दी आढळत राहिल्यास कोरोना संसर्ग विषाणूची लागण होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, हेही तेवढेच खरे.

समाजाच्या सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडू नये

कारण तालुक्यात पुणे आणि मुंबई या मोठ्या शहरांमध्ये कामाधंद्याच्या निमित्ताने गेलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि ती सर्व कुटुंबे कोरोनाच्या भीतीपोटी आणि हाताला काम नसल्याकारणाने हल्ली आपापल्या घरी परतली आहेत. त्यामुळे आता सर्वच नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या व पर्यायाने समाजाच्या सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडू नये, एवढाच मार्ग सध्याच्या परिस्थितीत उरलेला आहे. कोरोनाची ही साखळी आपण फक्त आणि फक्त घरात राहूनच तोडू शकतो हे आता सर्वांनी ओळखले पाहिजे.

येथील उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी हदगाव शहरासह हिमायतनगर, तामसा, निवघा बाजार, बामणीफाटा, मनाठा या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी आपले लक्ष केंद्रित केले असून पूर्णतः लॉकडाउन यांसह जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना वेळेचे बंधन घालून दिले आहे. सोबतच विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर आपली वचक दाखवून देत काही अतिउत्साही मंडळींना ५०० रुपयांचा दंडही आकारण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये बराच फरक पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com