पत्रे उडालेली शाळा उघडीबोडखी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

जिल्हा परिषदेच्या तुळशीबाग शाळेच्या दोन वर्गखोल्यांची पत्रे दोन महिन्यांपूर्वी उडाले. मात्र, अजूनही शिक्षण विभागाने या खोल्यांवर ना पत्रे टाकले, ना दुरुस्ती केली. या उघड्याबोडख्या शाळेत ज्ञानार्जन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.

गंगापूर, ता. 7 (जि.औरंगाबाद) : जिल्हा परिषदेच्या तुळशीबाग शाळेच्या दोन वर्गखोल्यांची पत्रे दोन महिन्यांपूर्वी उडाले. मात्र, अजूनही शिक्षण विभागाने या खोल्यांवर ना पत्रे टाकले, ना दुरुस्ती केली. या उघड्याबोडख्या शाळेत ज्ञानार्जन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.

येथील शाळेत शंभर विद्यार्थी शिकतात. एवढ्या विद्यार्थ्यांना जागा अपुरी पडत असून, तिसरी, चौथीचा वर्ग एकाच खोलीत भरवला जात असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कुठे बसवायचे हा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. शाळेत चार शिक्षक आहेत. याच ठिकाणी जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा असून, शेकडो विद्यार्थी शाळेत शिक्षण घेतात. शाळा परिसराला सरक्षण भिंत नसल्याने डुकरांचाही येथे वावर असतो. अशा परिस्थितीत शिक्षक शिकवतात; मात्र वर्गखोल्यांचे पत्रेच उडाल्याने मोठी तारांबळ उडाली आहे.

मतदान केंद्र

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत याच दोन वर्गखोल्यांत मतदान केंद्र होते.
त्यावेळी दुरुस्तीसाठी निधी आला होता. त्यातून दुरुस्ती करण्यात आली. मात्र, दुरुस्ती करूनही पावसाने वर्गखोल्यांचे नुकसान केले. आता विधानसभा निवडणुका आहेत. त्यापूर्वी तरी दुरुस्ती व्हावी, अशी मागणी होत आहे.

 

या दोन वर्गखोल्यांवरील पत्रे उडाल्याने एका वर्गाच्या विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही. शिक्षण विभागाला याविषयी माहिती दिली आहे; पण दोन महिने उलटूनही अद्याप दुरुस्ती झालेली नाही. विद्यार्थ्यांच्या हितासाठी तत्काळ दुरुस्तीची अपेक्षा आहे.

- नसीर शेख, शिक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There Is No Sheds On School