Latur : वैद्यकीय क्षेत्रात ‘विवेकानंद’ पॅटर्न व्हावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय क्षेत्रात ‘विवेकानंद’ पॅटर्न व्हावा

वैद्यकीय क्षेत्रात ‘विवेकानंद’ पॅटर्न व्हावा

लातूर : ‘‘देशात शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्न तयार झाला आहे. तसाच आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात विवेकानंद मेडिकल फाउंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटरने पॅटर्न तयार करावा’’, अशी अपेक्षा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केली.

कर्करोग रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची सोय व्हावी म्हणून येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या विवेकानंद रुग्णसेवा सदनचे लोकार्पण गुरुवारी (ता. २५) श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. अनंत पंढरे, डॉ. कैलाश शर्मा, सेंटरचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे, रुग्णसेवा सदन समितीचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. अरुणा देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती.

गडकरी म्हणाले, ‘‘देशात आज आरोग्य क्षेत्राची अवस्था बिकट आहे. वैद्यकीय साधने कमी आहेत. औषधांच्या किमती जास्त आहेत. उपचार परवडत नसल्याने गरीब लोक मृत्यू पत्करतात. डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे अशक्यप्राय गोष्ट बनत चालली आहे. अशा परिस्थितीत चॅरिटेबल संस्थांनी कमी दरात आरोग्य सेवा देण्यासाठी पुढे आले पाहिजे. कर्करोग रोगावर उपचार करण्यासाठी अनेक रुग्णालये निर्माण होत आहेत. पण, कर्करोगच होणार नाही यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी संशोधन करण्याची गरज आहे’’, असे गडकरी म्हणाले.

चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान होत नाही, समर्थन मिळत नाही आणि वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा होत नाही. चांगले काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. यातून गुणात्मक परिवर्तन होईल. शिक्षणाचा अर्थ केवळ ज्ञान प्राप्त करणे असे नाही. ज्ञान ही शक्ती आहे. पण, त्यासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार होणेही गरजेचे आहे. परमेश्वर समजून गरिबाची सेवा करण्याची गरज आहे; तसेच कार्य येथे विवेकानंद रुग्णालयाच्या वतीने होत आहे. चांगले काम होत असल्याने लोकांचा सहभाग त्यात राहिला. आता वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी लातूर पॅटर्न निर्माण करावा, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली. तीन वर्षांत लोकसहभागातून पाच कोटी रुपये खर्च करून हे सदन उभारले गेल्याची माहिती डॉ. कुकडे यांनी दिली. कुमुदिनी भार्गव यांनी सूत्रसंचालन केले.

कटआऊटपेक्षा काम करा

आरोग्य, कृषी, शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यास मोठा वाव आहे. कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधीलकीतून यात काम केले तर त्यांना रस्त्यावर कटआउट लावण्याची गरज भासणार नाही, असा सल्ला गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिला.

loading image
go to top